चोपडा रोटरी उत्सव पॅटर्न सर्व जिल्ह्याने स्विकारावा... जिल्हाधिकारी अभिजित राऊत..
♦️ चोपडा रोटरी उत्सव २२ चे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
चोपडा दि.२९(प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात रोजी रोटरी क्लब ऑफ चोपडा द्वारा आयोजित रोटरी उत्सव २०२२ चे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते दिमाखदार संपन्न झाले . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अरुणभाई गुजराथी ( माजी अध्यक्ष , विधानसभा , महाराष्ट्र राज्य ) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून यावेळी कैलास गोरख पाटील ( माजी आमदार ) ,दिलीपराव शंकरराव सोनवणे ( माजी आमदार , विधान परिषद ) , सौ अश्विनी गुजराथी ( डिस्ट्रिक्ट चेअरमन, इनरव्हील DIST - 303 ), डॉ सुरेश बोरोले, ॲड घनःश्याम निंबाजी पाटील , सागर ओतारी , आशिष गुजराथी , तहसिलदार अनिल गावित , गनीभाई , चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले , सचिव रोटे.प्रवीण मिस्त्री, प्रकल्प प्रमुख रोटे. ॲड रुपेश पाटील , सहप्रकल्प प्रमुख चेतन टाटिया , एनकलेव चेअर एम डब्ल्यू पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत उद्घाटन मनोगतात म्हणाले की, चोपडा रोटरी उत्सव पॅटर्न संपूर्ण जिल्ह्याने स्विकारावा. सदर रोटरी उत्सव शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, शेती, आरोग्य आणि सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना चालना देणारा आहे. त्यासोबत मनोरंजनाला वाव देणारा आहे. चोपडा तालुका सांस्कृतीक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याना सांस्कृतीक व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
प्रा. अरूणभाई गुजराथी म्हणाले की, चोपडा रोटरी ५० वर्षांची झाली असून फक्त सेवा हे एकच ध्येय ठेवून रोटरी कार्य करीत आहे. १९६२ व १९७२ च्या दुष्काळात रोटरी क्लब ऑफ चोपडाने फक्त १० पैशांत भाकरी उपलब्ध करून दिली होती. रोटरी उत्सवाचे उत्तम आयोजन केले असून एकाच छताखाली सर्वच उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर उत्सवातील नफा समाजसेवेसाठी वापरला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सलग चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात चोपडेकरांना विविध प्रकारच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यात २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम, विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम व संदीप सोनार निर्मित स्वरांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे . ३० एप्रिल रोजी बापू डेअरीचे संचालक बापू महाजन यांचे " शून्यातून विश्व " या विषयावर व्याख्यान असणार आहे तर अस्सल खान्देशी कलाकार प्रवीण माळी यांचे " आयतं पोयतं सख्यानं " यांचा एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी भास्कर पाटील ( उप सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन मंडळ पुणे ) यांचे कृषिमाल विक्रीचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तर इ - बाईकचे महत्व व भविष्य या विषयावर श्रीराम पाटील यांचे व्याख्यान , तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. २ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रम , पियुष जाधव ( संगीत विशारद ) यांचे बासरी वादन व रोटरी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.
जीवनाचा आनंद रंगे - रोटरी उत्सवाच्या संगे' हया थीमनुसार चोपडा रोटरी क्लब ने उत्सव २२ चे आयोजन केले आहे. सदर उत्सवात बिझिनेस स्टॉल ४९, प्रिमियम कॉर्नर स्टॉल ३, एकझीकेटीव्ह स्टॉल २, प्रिमियम बिझिनेस स्टॉल १४, प्रिमियम ऑटोस्टॉल ६, खाद्यपदार्थ स्टॉल ६० अशा एकूण १३४ दुकानांद्वारे या उत्सवात ग्राहकांसाठी विक्री तसेच बालगोपालांसाठी हौसमौज व विविध करमणुकीची साधने , खेळण्यांची दुकाने या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
या चार दिवसीय रोटरी उत्सवात किमान एक लाख लोक भेटी देतील असा आशावाद चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. पंकज बोरोले , रोटे.प्रविण मिस्त्री (मानद सचिव ) ,प्रकल्प प्रमुख रोटे. ॲड. रुपेश पाटील , सह प्रकल्प प्रमुख रोटे. चेतन टाटिया , रोटे.तेजस जैन (खजिनदार) आदिंनी व्यक्त केला आहे. शहरातील व तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोटरी उत्सवाच्या आनंद घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे..