चोपडा येथील निलेश पाटील युक्रेन हून मायदेशी सुखरूप परत... औक्षण करून केले स्वागत ....
चोपडादि.२३ (प्रतिनिधी):---
चोपडा येथील शशिकांत नगर मधील निलेश योगराज पाटील मागील चार वर्षापासून वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन या देशात वास्तव्यास होते. ते टर्नपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत. रशिया - युक्रेन युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून , आपला जीव मुठीत घेऊन मायदेशी परतावे लागत आहे .त्यापैकी निलेश पाटील हे एक आहेत .आज चोपडा येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले .सर्वप्रथम औक्षण करून व फटाक्यांची आतिषबाजी करत मित्रमंडळी व नातेवाईकांनी त्यांचे खूप खूप स्वागत केले.
ते मायदेशी परतत असताना टर्नपिल हून लविव मार्गे पोलंड बॉर्डर वर गेले. पण पोलंड बॉर्डरवर तोबा गर्दी असल्यामुळे ते पुन्हा परत लेविवला आले. तेथून वुझरोद मार्गे स्लोवाकिया बॉर्डर येथे गेले तेथे भारतीय अंबसी यांनी राहण्याची व खाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. दुसर्या दिवशी त्यांना स्लोवाकिया बॉर्डर वरून एका विमानाने दिल्लीला रवाना केले. दिल्लीला एक दिवस महाराष्ट्र भवनात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती व दुसऱ्या दिवशी विमानाने मुंबईला सर्व विद्यार्थ्यांना सोडण्यात आले .तेथून सर्व विद्यार्थी आपापल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत.
ते आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, रशिया - युक्रेन युद्धामुळे विद्यार्थ्यांवर अचानक आलेले संकट अतिशय भयावह होते . पण भारत सरकारने शर्थीचे प्रयत्न करून आम्हाला मायदेशी सुखरूप परत आणले. आमचे वैद्यकीय शिक्षण अजून किमान दीड ते दोन वर्षाचे बाकी आहे तरी भारत सरकारने आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या अपूर्ण असलेल्या शिक्षणावर विचार करून योग्य तो मार्ग काढावा अशी अपेक्षा व चिंता निलेश पाटील यांनी व्यक्त केली.
स्वागत प्रसंगी आजोबा विठ्ठल दामू पाटील( निवृत्त मुख्याध्यापक ) , आजी लक्ष्मीबाई विठ्ठल पाटील, विजय मोहन पाटील, अशोक मोहन पाटील, दिपेश पाटील, निशांत जाधव , प्रकाश पाटील , पत्रकार आर डी पाटील, डॉ जे डी चव्हाण आदी उपस्थित होते....
