शबरी घरकुल योजनेत आर्थिक भ्रष्ट्राचार डॉ.चंद्रकांत बारेला यांची चौकशीची मागणी
चोपडादि.२४ ( प्रतिनिधी ) आदिवासी बांधवांसाठी शासनाने सुरू केलेल्या महत्वपूर्ण शबरी घरकुल योजनेत चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्ट्राचार झाला असून पंचायत समितीचे काही पदाधिकारी, अधिकारी ग्रामसेवक यांनी आदिवासी लोकांच्या अज्ञान पणाचा फायदा घेत घोटाळा केला असून त्या सर्व भ्रष्ट्राचारी मंडळींची चौकशी होऊन त्यांच्या वर कायदेशीरपणे कारवाई व्हावी अशी लेखी मागणी प्रकल्प स्तरीय नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली आहे.
डॉ.बारेला यांनी या संदर्भात माहीती देतांना सांगितले की, शबरी घरकुल योजनेत जून २०२१ च्या परिपत्रकानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी ६७४ घरकुलांचा कोटा आहे.त्यात
चोपडा तालुक्यासाठी १०८ लक्षांक असतांना पंचायत समिती चोपडा येथील काही अधिकारी पदाधिकारी,ग्रामसेवक यांनी संगनमत करून आदिवासी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत प्रत्येकी पाच ते सात हजार रुपये उकळले आहेत.१०८ लक्षांक असतांना जवळपास ७५० लोकांकडून हे पैसे जमा करण्यात आले आहेत वास्तविक पाहता शबरी घरकुल योजनेचा पंचायत समिती,गटविकास अधिकारी,पदाधिकारी,ग्रामसेवक यांचा दुरान्वये काहीही संबंध येत नाही.शबरी घरकुलच्या याद्या या आदिवासी प्रकल्प समिती कार्यालया मार्फत तयार होत असतात.पण तुम्हाला सदर योजनेचा लाभ मिळवून देतो,असे आमिष देत हा मोठा गैरव्यवहार झाला आहे.ज्यांनी ज्यांनी हे पैसे गोळा केले आहेत त्यांची नावं लवकरच आपल्याकडे येणार असून काही तक्रारदार देखील तक्रार देण्यास तयार झाले आहेत.ज्या आदिवासी बांधवांना आर्थिक लुबाडले गेले आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन करत,यासंदर्भात आपण जिल्हा परिषदेचे सी.ओ.यांना ईमेलद्वारे तक्रार केली असून लवकरच समक्ष भेटून सविस्तर निवेदन देणार असून जोपर्यंत या भ्रष्ट्राचारी लोकांना शिक्षा मिळत नाही तोवर आपण स्वस्थ बसणार नाहीत,वेळप्रसंगी आंदोलनाची आपली तयारी असल्याचेही प्रकल्प समिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी सांगितले.