ग्राम संस्कृतीची जपणूक, मराठी भाषा संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ...यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनाची गरज- संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर







ग्राम संस्कृतीची जपणूक, मराठी भाषा संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ...यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनाची गरज- संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर

कोकण दि.२३ (शांताराम गुडेकर )राजापूर-लांजा नागरिक संघ, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली खोर निनको गावांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. झाशीची राणी लक्ष्मी बाई यांच्या कोट या गावातून क्रांती ज्योतीच्या मिरवणूकीने हा साहित्य उत्सव सुरू झाला. भल्या सकाळीच शिवशाही मराठमोळ्या पोषाखात सजले होते. युवक युवतींचे ढोल आणि लेझीम पथक, सजलेली बैलगाडी,  पाठोपाठ ग्रंथ दिंडी अशा मोठी मिरवणूकीची सांगता आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाली.

          कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या हस्ते संघाच्या ध्वजाचे आरोहण आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर मुख्य मंडपात शिव छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दीपज्वलन झाल्यावर संमेलनाचे कार्यक्रम सुरू झाले.. अध्यक्षीय भाषणात अशोक लोटणकर यांनी ग्राम संस्कृतीची जपणूक, ग्रामीण बोली/मराठी भाषा संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन  या साठी ग्रामीण साहित्य संमेलनाची गरज असल्याचे विशद केले , आणि  वर्तमानातल्या ग्रामीण साहित्याच्या आशयाचा आढावा घेत भविष्यात साहित्या कडून असणाऱ्या अपेक्षां बद्दल भाष्य केले. बदलत्या परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात पडणे आवश्यक आहे असे ते म्हणाले . त्याच बरोबर नव्या पिढीला पुस्तक वाचण्याची गोडी लावणे, इंटरनेट तंत्र ज्ञानाचा विधायक उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले पाहिजे असे ते म्हणाले. या वेळी "अशी घडली राजस्वीनी" सह अन्य चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. या वेळी राजापूर-लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड उपस्थित होते. या वेळी साप्ताहिक कोकणचे  संपादक प्रमोद कोनकर आणि  राजेंद्र प्रसाद मसुरकर यांचा सत्कार करण्यात आला.

              संमेलनात प्राचार्य डाॕ.दत्ता पवार यांचे कोकणचा विकास आणि मानसिकता या विषयावर परखड व्याख्यान झाले. दूरदर्शन निवेदिका दिपाली केळकर यांचे ' पारंपारिक ओव्या आणि उखाणे' या विषयावर सुरेख  व्याख्यान झाले. गडकिल्ले अभ्यासक भगवान चिले यांचे  विशाळगड आणि परिसर' बद्दल अभ्यासपूर्ण भाषण झाले. भैरवी जाधव यांचा स्वर संध्या हा गीत गायनाचा कार्यक्रम तसेच शुभेच्छा पत्रांचे जनक प्रसाद कुलकर्णी यांच्याशी संवाद आणि कवी संमेलन उत्साहात पार पडले. शेवटच्या दिवशी विविध पुरस्कारांचे वितरण मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांचे हस्ते झाले तसेच त्यांनी संमेलना बाबत आपले विचार व्यक्त केले. दिवंगत चित्रकार बाळ ठाकूर यांना मरणोत्तर ' जीवन गोरव पुरस्कार ' प्रदान करण्यात आला. पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या परशुराम गंगावणे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन रसिकांना लाभले.राजापूर-लांजा नागरिक संघ मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच ग्रामस्थ यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. प्रा. विजय हटकर, प्रकाश हरचेकर आणि दिपक नागवेकर यांनी तिन्ही दिवस आपल्या बहारदार शैलीत  उत्तम निवेदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने