*रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशाची न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे..पंतप्रधान व राष्ट्रपती यांनी व्यक्त केले भावना*
मुंबई दि.६: आपल्या जादूई आवाजाने जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नाही. दयाळू आणि सर्वांची देखभाल करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते कधीच भरून निघणारं नाही. आपल्या सूरेल आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्यात अद्वितीय क्षमता होती. भारतीय संस्कृतीच्या दिग्गज म्हणून येणारी पिढी त्यांना कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विटरवरून लतादीदींना श्रद्धांजली वाहताना त्यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
*लतादीदींच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूल* *पंतप्रधान*
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकापाठोपाठ तीन ट्विट केली आहेत. लतादीदींनी अनेक दशके फिल्मी जगतातील बदल पाहिला. सिनेमापलिकडे भारताच्या विकासाबाबत त्या विचार करायच्या. त्यांना नेहमी एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. लतादीदींसोबत अनेकदा गप्पा झाल्या. त्या अविस्मरणीय होत्या. लतादीदींच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. त्यांच्या कुटुंबासोबत मी संवाद साधला. त्यांच्या प्रती माझ्या संवेदना आहे, असं ट्विट मोदींनी केलं होतं.
*दैवी आवाज लोपला- राष्ट्रपती*
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लतादीदींचं निधनाची बातमी जशी जगभरातील लोकांसाठी धक्कादायक आहे. तशीच माझ्यासाठीही धक्कादायक आहे. त्यांच्या गाण्याने संपूर्ण देशाला मोहून टाकले होते. एखादा कलाकार देशात एकदाच जन्माला येतो. माणूस म्हणूनही लतादीदी महान होत्या. जेव्हा मी तेव्हा भेटलो तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवले. एक दैवी आवाज आज लोपला आहे. पण त्यांचे सूर कायम राहतील, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे.