आत्म्याच्या शुद्धीसाठी योगा शिवाय दुसरा पर्याय नाही....पंकज समूह आयोजित ओम शांती केंद्र येथील कार्यक्रमात प्रा.अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन...

 



आत्म्याच्या शुद्धीसाठी योगा शिवाय दुसरा पर्याय नाही....पंकज समूह आयोजित ओम शांती केंद्र येथील कार्यक्रमात प्रा.अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन...

    चोपडा दि.२६( प्रतिनिधी):---

      पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले यांच्या आई - वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चोपडा येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ओम शांती केंद्र येथे ब्रह्म भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे होते .जीवनात योग खूप महत्वाचे असून सर्वात श्रेष्ठ राज योग आहे आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी योगा शिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

      ते पुढे म्हणाले की,जीवन अधिक सुंदर करण्यासाठी योगाची परिणामी ब्रह्मकुमारी या संस्थेची  गरज आहे. आजचा कार्यक्रम सात्विक पवित्र व पवित्रतेचा संदेश देणारा आहे. आनंद दिल्याने आनंद वाढतो .ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात आनंद हा सदैव मिळत असतो .पृथ्वीवरचा स्वर्ग पाहायचा असेल तर प्रत्येकाने दरवर्षी माउंटअबू येथे जायला हवं असे त्यांनी आवाहन देखील केले. संवेदना -  वेदना ओळखण्याचे कार्य ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय मार्फत केले जाते. जिथे शास्त्र संपते तिथे अध्यात्म सुरू होते . शास्त्रात धन महत्त्वाचे तर अध्यात्मात समाधान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मेडिटेशन -  ध्यानधारणा सर्वात महत्त्वाचे असून प्रत्येकाने योग व ध्यानधारणा करावी. आपले जीवन अधिक सफल करावे. माणूसकीने जगा व माणुसकीने जगवा हा संदेश या संस्थेमार्फत दिला जात असल्याचे ते म्हणाले.

      कार्यक्रमाचे आयोजक व  पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ  सुरेश बोरोले आपल्या मनोगतात म्हणाले की ,दोन वर्षापासून कोरोना काळात कार्यक्रम घेता आले नाहीत. आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ब्रह्मभोजन देण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली.१९९० पासून ओम शांती केंद्राशी जुळलो असल्याचे ते म्हणाले  पंकज नगर मधील सेंटर केवळ दोन महिन्याच्या आत उभारणी करून दिले असल्याचे सांगितले. माझ्या शिवबाबावर विश्वास असून ,अनेक कार्य बाबा माझ्या हातून करून घेत असल्याचे ते म्हणाले .मुलगा पंकज यांस लहानपणी सर्पदंश झाला होता. डॉक्टरांनी देखील हिम्मत सोडली होती पण माझा शिवबाबावर अतूट विश्वास असल्याने व अपार श्रद्धा असल्याने सर्व गोष्टी मनासारख्या घडल्या. हा प्रसंग कथन करताना ते भावूक देखील झाले होते. कार्यक्रमा दरम्यान पंकज समुहाचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांनी ओमशांतीनगर येथील सेंटरसाठी एक लाख रुपयांचा धनादेश चोपडा सेंटरच्या संचालिका मंगला दीदी यांच्याकडे सुपूर्द केला.

     जळगाव केंद्राच्या संचालिका मीनाक्षी दिदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . सर्वांनी विश्‍वशांतीसाठी प्रार्थना करून शांततेचे प्रतीक बनण्याचे त्यांनी आवाहन केले .जळगाव शहरात सहा एकर जमिनीवर ओम शांती केंद्राची निर्मिती होत असून त्याद्वारे विविध माध्यमातून ज्ञान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .त्यांनी ब्राह्मण भोजनाचे महत्त्व देखील स्पष्ट केले.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत कु. आरुषी सुनील पाटील ( रुखनखेडा ) या विद्यार्थिनीने सादर केले .उपस्थित मान्यवरांचे स्वागत तिलक लावून व  गुलाबपुष्प देऊन अश्विनी दीदी (बोदवड ) व पुष्पा दीदी ( एरंडोल ) यांनी केले.

    सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर जळगाव केंद्राच्या संचालिका मीनाक्षी दीदी, चोपडा केंद्राच्या संचालिका मंगला दीदी, प्रा.अरुणभाई गुजराथी ( माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) ,डॉ. सुरेश बोरोले ( अध्यक्ष पंकज समूह )  कैलास बापू पाटील (माजी आमदार ) प्रा.दिलीपराव सोनवणे ( माजी शिक्षक आमदार ) घनःश्याम अग्रवाल ( संचालक जेडीसीसी बँक जळगाव ) ,चंद्रहास गुजराथी ( अध्यक्ष चोपडा पिपल बँक ) ,गोरख तात्या पाटील ( माजी जि प अध्यक्ष ), सौ.इंदिराताई पाटील (मा जि. प. सदस्य ), ॲड घनःश्याम निंबाजी पाटील (मा.चेअरमन चोसाका) , के डी चौधरी सर (चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष ), पंकज बोरोले ( संचालक - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा , अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ चोपडा ), अविनाश राणे ( उपाध्यक्ष - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ) सौ.हेमलता बोरोले ,सौ दिपाली बोरोले आदी मान्यवर उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडा सेंटरच्या संचालिका मंगला दीदी यांनी केले .सूत्रसंचालन राज दीदी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी मानले....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने