मनवेल आश्रमशाळेतील शिक्षक राकेश महाजन राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित
मनवेल , ता. यावलदि.२७(प्रतिनिधी) - येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक राकेश चिंधू महाजन यांना नुकतेच राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था , जळगाव यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातून एकूण ४० जणांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . सदर सत्कार समारंभाला महापौर जयश्री महाजन , शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी पाटील , राजनंदिनी संस्थाध्यक्षा संदीपा वाघ , ज्ञानेश्वर वाघ , ग.स. संचालक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते .
शिक्षक राकेश महाजन यांनी आपल्या एकोणवीस वर्षांच्या सेवेत विदयार्थांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत . ते प्रत्येक महापुरुषाची जयंती - पुण्यतिथी , विविध दिनविशेष शाळेत आवर्जुन साजरे करतात . वक्तृत्व स्पर्धा , क्रीडा स्पर्धा , गायन व नृत्य स्पर्धा , विज्ञान प्रदर्शन यासाठी विदयार्थ्यांची तयारी करुन घेतात . विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर स्वतः नाटकांचे लेखन करतात व विदयार्थ्यांची तयारी घेऊन ती नाटके गावात , शाळेत सादर करतात . नाटक , कथा लेखनाबरोबर ते कविता लेखन देखील करतात . सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व शिष्यवृत्ती परीक्षा याबाबत केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध वेळा तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे . शिक्षक राकेश महाजन यांनी स्वतः १९ वेळेस रक्तदान केले असून ते रक्तदान शिबीर आयोजनास सहकार्य करीत असतात . त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असून या कार्यासाठी ते इतरांनाही प्रेरीत करीत असतात . त्यांचा शैक्षणिक कार्याप्रमाणेच सामाजिक कार्यात देखील सक्रीय सहभाग असतो. माळी समाजाच्या राज्यस्तरीय अनिष्ट चालीरिती व व्यसनमुक्ती समितीमार्फत महिन्यातून किमान एका गावाला भेट देऊन रात्रीच्या वेळी समाजबांधवांची सभा घेतात व सदर सभेत ते समाजातील अनिष्ट चालीरिती व व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन करतात .
शिक्षक राकेश महाजन यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी क्रियाशील शिक्षक पुरस्कार , महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार , कर्तृत्ववान उपक्रमशील शिक्षक पुरस्कार , काव्ययात्री पुरस्कार , आश्रमशाळा आदर्श कर्मचारी पुरस्कार असे एकूण सात पुरस्कार मिळालेले आहेत .
नुकतेच राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक राकेश महाजन यांचे मनवेल आश्रमशाळा संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील , उपाध्यक्ष बी.एल. देशमुख , सचिव मीराताई पाटील , सहसचिव यादवराव पाटील , खजिनदार अॅड. ललित पाटील , सभासद देवीदास पाटील , मंगलराव पाटील , प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे , माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील , अधीक्षक वसंत पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .