कर्जाणे,देवझीरी आश्रमशाळांना ..डॉ.चंद्रकांत बारेला यांची भेट

 


कर्जाणे,देवझीरी आश्रमशाळांना  ..डॉ.चंद्रकांत बारेला यांची भेट

चोपडादि.२६ ( प्रतिनिधी ) - आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बारेला यांनी नुकतीच कर्जाणे,देवझीरी आदिवासी आश्रम शाळांना भेटी देऊन पाहणी केली.या पाहणी दौऱ्यात कर्जाणे येथील अनुदानीत आश्रम शाळेची व्यवस्था उत्तम तर देवझीरी येथील शासकीय आश्रमशाळेची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनास आले असून  देवझीरी आश्रमशाळेचा अहवाल आपण लवकरच आदिवासी विकास मंत्री ना.के.सी. पाडवी यांना पाठवणार असल्याचे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी सांगितले.

कर्जाणे येथील आश्रमशाळेत विद्यार्थी शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या समाधान कारक होती.जेवणाची व्यवस्था चांगली होती, मुलांना आंघोळीला गरम पाणी,वसतीगृह नीटनेटके,व्यायाम शाळा,सुसज्ज प्रयोगशाळा, बघायला मिळाली.डॉ.बारेला यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरे विचारून बघितली त्यात मुलांनी योग्य उत्तरे दिली.त्यामुळे शाळेत शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचे लक्षात आले इयत्ता १ ली ते ९ वी ची विद्यार्थी संख्या थोडी कमी जाणवली त्यामुळे ती संख्या वाढवण्याची सूचना देण्यात आली.१० वी १२ वी च्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे Neet चे फॉर्म भरावेत अशीही सूचना डॉ.बारेला यांनी शिक्षकांना दिली.

देवझीरी शासकीय आश्रमशाळेला भेट दिली असता तिथं शिक्षणाचा खेळ - खंडोबा झालेला बघायला मिळाला.शिक्षक,विद्यार्थी अधिक्षिका कुणीही ठिकाणावर नव्हते.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,स्वयंपाकी,विना परवानगी सुट्टी टाकून दांड्या मारत असतात,कधीतरी एकत्र येऊन मस्टरवर सह्या करतात मुलींचे मुलांचे वसतीगृह बंद असून भोजन व्यवस्था शासकीय नियमा नुसार नाही,शिक्षण साहीत्य,पुस्तके कपाटात धूळ खात पडलेले असून ते मुलांना वाटप केले गेले नाही.यावल प्रकल्प कार्यालयाकडून शाळे

साठी संगणक देण्यात आले आहे,मात्र शाळेत

संगणक नाही,मग गेले कुठे ? असा संतप्त सवाल डॉ.बारेला यांनी यावेळी विचारला.प्रयोग शाळा नाही,ठेका पद्धतीने दिला जाणारा किराणा सामान नाही,भाजीपाला,केळी,अंडी,

वेळेवर पोचत नाही.वर्षभरापासून मुलांना केळी सुध्दा दिलेली नाही.शाळेचे मुख्याध्यापक सुनील चौधरी,अधीक्षक सुनील गढे यांच्या मनमानी कारभाराला पालक,विद्यार्थी कंटाळले

असून शाळेचा ८० टक्के सामान हेच घरी घेऊन

जात असल्याचा आरोप पालकांनी केला, शाळेत विद्यार्थी संख्या नाही,गणित विज्ञानाचे शिक्षक नाहीत,समिती अध्यक्ष येणार ही भनक लागली म्हणून गावातील मुलं मुली ज्यांचा शाळेशी काहीही संबंध नाही त्यांना जबरदस्तीने शाळेत बसवण्यात आले. मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी शाळेत कहर माजवला असल्याचे यावेळी लक्षात आले. त्यांची योग्य त्या ठिकाणी तक्रार करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचे डॉ.बारेला यांनी सांगितले.

-------- बांधकाम बंद करण्याचे आदेश ----------

शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्या दुरुस्तीचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे सुरू आहे. ८० लाखात संपूर्ण इमारत नवीन बांधून तयार होऊ शकते,मात्र दुरुस्ती सुध्दा चांगल्या 

पध्दतीने करण्यात येत नाही याबद्दल नाराजी व्यक्त करीत सदरचे बांधकाम त्वरित बंद करावे असे आदेश डॉ.चंद्रकांत बारेला यांनी दिले असून,लवकरच संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांना बोलावून क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी व चौकशी करण्यात येणार असल्याचेही डॉ.बारेला यांनी सांगितले.

---------------------------------------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने