पोलादपूर नगरपंचायत आणि कापडे बुद्रुक ग्रुपग्राम पंचायतीसाठी भरघोस निधी देता आल्यानेच जनतेचे प्रेम - आ.भरतशेठ गोगावले
कोकण दि.२७ (शांताराम गुडेकर) स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील पहिल्या इमारतीचे काम कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीसाठी करण्यात येऊन आज लोकार्पण करण्यात येत आहे. पोलादपूर नगरपंचायत असो अथवा कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत असो, या दोन्ही ठिकाणी भरघोस विकासनिधी देत असल्यानेच जनतेचे प्रेम मिळत असल्याचे मत महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केले.स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीची ही पहिली इमारत दिमाखाने उभी राहिल्यानंतर आ.गोगावले यांच्याहस्ते मंगळवार दि. 25 जानेवारी 2022 रोजी शानदार उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपिठावर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे व सुमन कुंभार, सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, पं.स.सदस्य यशवंत कासार, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, स्वदेस फाऊंडेशनचे प्रकल्पाधिकारी तुषार इनामदार,सरपंच सुवर्णा जितेंद्र सकपाळ व उपसरपंच उमेश सकपाळ तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व माजी सरपंच व उपसरपंच यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी कापडे बुद्रुक येथील इनामवाडीतील रस्त्याच्या कामाचे काँक्रीटीकरणाचा शुभारंभ आ.गोगावले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आ.गोगावले यांनी, पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या माध्यमातून विकासाची कामे थोडयाफार प्रमाणात झुकते माप देऊन करीत असल्याने विरोधी पक्षाच्या लोकांकडेही आपण काम करीत असल्याने पुन्हा संधी मागत असतो. यापुढेही अशी संधी मिळणार असल्याने विकासकामेच आपणास महत्वाची वाटत असल्याचे सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर आपणास या भागाने दोन वेळा सलग रायगड जिल्हा परिषदेवर जाण्याची संधी दिली. याकाळात कापडयाच्या नाक्यावरच यशवंतराव मोरे यांनी सर्व समावेशक समाजाचे नेतृत्व करायचे असल्यास विकासकामे करताना भेदभाव न करता निवडून आलो की सर्वांचे असतो, हे मार्गदर्शन केलेले आजही लक्षात ठेवले असल्याचे सांगितले. आ.गोगावले यांनी पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुकप्रमाणेच वझरवाडी व अन्य गावांमध्येदेखील स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत इमारतींची उभारणी केली असल्याची माहिती यावेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी दिली.याप्रसंगी कापडे ग्रुपग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अनिल पवार, अंगणवाडी वा आशासेविका, आरोग्यउपकेंद्राच्या परिचारिका शिकलगार आदींचा सत्कार आ.गोगावले यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी प्रारंभी माजी सरपंच यशवंतदादा मोरे यांनी, कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीचे कार्यालय पूर्वी भाडयाने खोली घेऊन सुरू असे. त्यानंतर जवाहर योजनेतून ग्रामपंचायतीची इमारत बांधण्यात आली. आता ही मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत इमारत बांधण्यात आल्याचा विशेष आनंद होत असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी वाकणचे माजी सरपंच संजय मोदी यांनी पोलादपूर नगरपंचायत झाल्यानंतर सर्वाधिक विस्ताराची ग्रुपग्रामपंचायत असलेल्या कापडे बुद्रुक गावासाठी आ.गोगावले यांच्या माध्यमातून भरपूर विकासकामे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.