"" नौखनच्या जानाईची जेजुरी _ निवकने पालखी सोहळा.पदयात्रा ""



 "" नौखनच्या जानाईची जेजुरी _ निवकने पालखी सोहळा.पदयात्रा  "" 

  ‌संकलन__ श्री रामदास लांघी. जेजुरी. 


  ‌  जेजुरी व जेजुरीच्या पंचक्रोशीतील लोकांना प्राचिन काळापासून प्रसिद्ध व प्रचलित शब्द " नौखनच्या जानुबाईची यात्रा " म्हटले की जेजुरी ते निवकने पायी पदयात्रा पालखी सोहळा व दरवर्षी भक्तांनी आपापल्या मनात साठवलेल्या पदयात्रेतील  गोड आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहातात. माघ महिना येताच फाल्गून महिन्यात जाणाऱ्या पदयात्रा व उत्सव सोहोळ्याचे कडक थंडीचा काळ असतानासुद्धा लोकांना वेध लागतात. ते यामुळेच. 

          असे सांगतात की नागू माळ्याच्या भक्ती परंपरेतून जेजुरी ते निवकने वारी सुरु झाली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण खोऱ्यातील निवकने या गावापर्यंतचे सुमारे दोनशे ते सव्वा दोनशे‌ किलोमीटरचे अंतर पार करुन नागूमाळी आई जानुबाईची पायी वारी भक्तीने एकटाच वर्षानुवर्षे करत होता.आई जानुबाई आदिशक्ती पार्वतीचाच अवतार स्वरुप असून नागू माळ्यानंतर त्यांच्याबरोबरच तेव्हापासूनच्या ते आत्तापर्यंतच्या सर्वच भक्तांना श्री जननीमाता म्हणजेच जानुबाई देवीचे खूप जागृत असल्याचे सत्वशिल अनुभव फार प्राचिन काळापासून येत आहेत. 

       शेकडो वर्षापूर्वी कोणत्याही दळणवळणाचा अभाव असताना नागू माळी याने आडरानातून व प्रसंगी जंगलातून वारीला अनवाणी पायाने जाऊन‌ भक्ती केली. आळंदीच्या संत ज्ञानेश्वरांनी जशी पंढरीची वारी करुन पांडुरंगाचे जसे भक्ती अनुभव घेतले. तसेच नागू माळ्याने आई जानुबाईच्या भक्तीतून घेतलेले आहेत. तशाच अध्यात्म भक्तीचे वेध असंख्य भक्तांना लागले तर त्यात वावगे असे काय आहे ? म्हणूनच आळंदी _ पंढरीची जुन्या वारी परंपरेत आज लाखो भाविक पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. आई जानुबाईच्या पायी पदयात्रा पालखी सोहोळ्यात हल्लीच्या काळात सुमारे किमान पाच हजार भाविक असतातच. त्या संख्येत दिवसागणीक वाढच होत राहीली आहे. व परंपरेने नागू माळी ज्या मार्गाने वारीचे मार्गक्रमण करत होता. त्याच मार्गाने देवीची पालखी व सोबतचे वारकरी जात असतात. यातून शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची नागू माळ्याची वारी किती खडतर असेल? याची कल्पना येते. तशी आई जानुबाई देवीची निस्सीम भक्तीही कशी असते ? कशी असावी ? याची कल्पना येते. हाच अनुभव हल्लीची पायी वारी करणारे वारकरी पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी उताविळ असतात. म्हणूनच जणूकाही या दिवसाची ते वाटच बघत असतात. 

    ‌‌‌‌     पूर्वी पाच _ पंचवीस भाविक पदयात्रेत होते तेव्हा एक आठवड्याच्या या पायी प्रवासात भाविक पाच / सहा दिवस टिकेल व पुरेल असे अन्न घरातूनच निघते वेळेस बनवून घेत होते. अलिकडील काळात पायी वारी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असून  "अन्नदान मंडळ समिती " सर्व भक्तांना चहा नाश्ता जेवण यासाठी लागणारे साहित्य शिधा व आचारी दिमतीला ठेऊन भक्तांना लगोलग तयार केलेले गरम ताजे जेवण उपलब्ध करुन देत आहे. सोबतच पाण्यासाठी जेजुरी नगरपालिकेचा पाण्याचा टैंकर ;औषधे अंबुलन्स. असल्याने पूर्वीच्या‌ काळापेक्षा हल्ली भक्तांची वारी सुलभ व सुकर झाली आहे. कदाचित याहीमुळे का म्हणेना पायी वारी करणाऱ्या ‌भक्त मंडळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.     

           साधारणत: माघ महिन्यातील महाशिवरात्र झाल्यानंतर  पाच दिवसांनी या पालखी सोहळा पदयात्रेची सुरुवात होत असते. यंदा महाशिवरात्र १ मार्चला आहे. तर जेजुरीतून पदयात्रा सोहळा ५ तारखेला प्रयाण आहे. पहिल्या दिवशी कामठवाडी, दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील सालपे, तिसऱ्या दिवशी वडूथ गावी , चवथ्या दिवशी क्षेत्र माहुली, पाचव्या दिवशी तारळे इथे तर सहाव्या दिवशी पाटण खोऱ्यातील परमपूज्य महायोगी गगनगिरी महाराजांचे जन्मगाव असलेले निवकणे नजिक साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर खोऱ्यात डोंगरदरीच्या कुशीत अत्यंत नयनरम्य ठिकाणी ओढ्याच्या काठी एकांतात या जानाई मंदिराचे पवित्र अशा ठिकाणी क्रमवारीत मुक्काम असतात. हे मंदीर त्या ठिकाणी एकांतात जरी असले तरी सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील " निवकन्याच्या जानुबाई देवीची यात्रा " चांगलीच प्रसिद्ध आहे. 

      पुरंदर तालुका दुष्काळी भाग असून निरा गावापासून पुरंदर तालुक्याची व सोबतच पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडल्यानंतर सातारा जिल्यातील सुजलाम भागात प्रवेश करताच भक्तांसाठी वातावरण उल्हसित होत असते. व पुढे पुढे मार्गक्रमण करताना वारकरी दरवर्षी हा अतृप्त अनुभव आपल्या मनात साठवत असतात. म्हणूनच दरवर्षी त्या वारीची पुन्हा पुन्हा ओढ लागत राहाते. याच बरोबर आईसाहेब जानुबाईवरील भक्तीची अतूट श्रद्धा भक्तांच्या मनावरील वारीला जाण्याची ती उत्कंठा दृढ करुन जानुबाईच्या निवकन्याची यात्रा जवळ आली की वेध लागतात. ते यामुळेच. 



       

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने