विजबिल वसुलीसाठी बामखेडा.त.त येथे शेतांमधील डीपी कट
म्हसावद,ता. शहादा दि.२८:( प्रतिनिधी).
सध्या घरगुती तसेच शेतातील वीजबिल वसुलीसाठी विद्युत कनेक्शन तसेच शेतांमधील डीपी कट करण्याचे प्रमाण जिल्ह्यात सगळीकडे वाढले आहे. बामखेडा येथेही विजबिल वसुलीसाठी शेतातील डीपी कट केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.
विजबिल वसुलीसाठी शासनाकडून सक्तीचे पाऊल उचलण्यात आले असून विद्युत कंपनीचे अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे वसुलीसाठी दबाव आणत आहेत. त्यातूनच बामखेडा येथील शेतकऱ्यांवर बाकी असलेली वीज बिल वसुलीसाठी शेतांमधील डीपी कट केल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिके जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे विहिरी तसेच कूपनलिकांचे पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस लागवड तसेच गहु हरभरा पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीकडून गावोगावी शेतांमधील डीपी कट करण्याचे प्रमाण वाढले असून जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आपल्या पिकांना पाणी भरणार कसे? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
एकतर यावर्षी कापूस पिकाला भाव असला तरी उत्पादनात घट आलेली आहे. तर पपई पिकावर विषाणूजन्य रोगामुळे पपईचे पीक पूर्णतः खराब झाले आहे. तसेच कांदा पिकाचेही उत्पादन निघण्याच्या आधीच मर रोगामुळे शेतकऱ्यांना कांद्यावर रोटाविटर मारावा लागला आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा यासारखे पिके घेऊन खरीप हंगामाची भरपाई करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विद्युत वितरण कंपनीकडून विजबिल वसुलीसाठी डीपी कट केल्यामुळे शेतकरी पिके जगवतील कसे? असा सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. गहू - हरभरा सोबत पपई, मिरची, तूर, केळी,ऊस यासारख्या पिकांनाही पाण्याची नितांत गरज असून विद्युत वितरण कंपनीच्या डीपी कट करण्याच्या मनमानी कारभारामुळे नैसर्गिक संकटांव्यतिरिक्त कृत्रिम संकटांनाही सामोरे जावे लागत आहे.
कधी दुष्काळी परिस्थिती तर कधी अवकाळी पाऊस यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या पपई व केळी काढणीची वेळ असून केळीला केवळ तीनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल असा भाव भेटत आहे. व्यापारीही मंदीचे कारण पुढे करत चांगल्या भावाला भाव देत नाहीये. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांसाठी भांडवल लावले असून पिकांना जगवण्यासाठी कृषी पंपाचे वीज कनेक्शन पुन्हा जोडावे, अशी मागणी बामखेडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.