दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे..जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत




 दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे..जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

            जळगाव दि. 22(प्रतिनिधी) - कोणताही मतदार दुबार/बोगस नोंदणी होणार नाही याकरीता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

            भारत निवडणूक आयोगामार्फत 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम  1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सुरु आहे. याबाबत राजकीय पक्षांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, मतदार याद्या सुलभ होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले बुथनिहाय प्रतिनिधी (BLA) नेमावे त्याचबरोबर ज्याप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आल्या त्याच धर्तीवर शहरात वार्डनिहाय सभा घेऊन त्यात मतदार याद्यांचे वाचन करावे. तसेच नागरीकांना मतदार याद्यांबाबत काही अडचणी, शंका असल्यास त्यांनी आपल्या भागातील बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) शी संपर्क साधावा. आपल्या भागातील बुथ लेव्हल ऑफिसरची माहिती www.jalgaon.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध त्याचबरोबर नागरीकांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

            यावेळी श्री. हुलवळे यांनी मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित तयार होणारी मतदार यादी ही आगामी निवडणूकांसाठी वापरण्यात येणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी सजग राहून ही मतदार यादी सुलभ होण्यासाठी लक्ष्य गट निश्चित करावे. 13 व 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात 9632 नवीन फार्म जमा झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष गा्रमसभेत दावे/ हरकती प्राप्त झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर येत्या 27 व 28 नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नव मतदारांनी नोंद होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने