*आरोग्य यंत्रणेने प्रतिसाद न दिल्याने रिक्षेतच प्रसुती*
वाघडु ता. चाळीसगाव दि.२९(प्रतिनिधी)गरीब महिला आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत आली अन् तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. हाक मारूनही कुणीही दाद न दिल्याने अखेर या महिलेची आरोग्य उपकेंद्रातून रिक्षाने निघत असताना रिक्षातच प्रसूती झाली. उंबरखेड, ता. कन्नड येथील रहिवासी असलेले हुकूमचंद चव्हाण, वनिता चव्हाण या दाम्पत्याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मिळेल ते मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दि. २५ रोजी दुपारच्या दरम्यान वनिता चव्हाण हिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. पत्नीची प्रसूती सुखरूप व्हावी म्हणून ते उंबरखेडवरून दुचाकीवर लोणजे येथे बहिणीकडे आले. लोणजेतून रिक्षा करून बहिणीसह राजणगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या गेटजवळ आले. तेथे येताच महिलेच्या पोटात जोरजोरात कळा निघू लागल्या. येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमधून हाक देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या गरीब महिलेला रिक्षाने चाळीसगाव येथे नेत असताना घाटरोड पोलीस चौकीजवळ रिक्षातच आपल्या मुलीला जन्म द्यावा लागला.