माहिती अधिकाराचा दणका, ग्रामसेवकावर पाच हजाराची शास्तीची कार्यवाही ! ..
शिंदखेडा दि.०१( प्रतिनिधी) ग्रामपंचायत सुकापूर ता साक्री जि धुळे येथील ग्रामसेवक श्री ए एम ठाकरे कडून माहिती अधिकार कार्यकर्ता धनराज व्ही निकम यांना माहिती न दिल्यामुळे ग्रामसेवकाकडून ५हजार रूपये दोन पगारातून कपात करण्यात यावी असा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना नाशिक खंडपीठाचे माहिती आयुक्त के.एल.बिष्णोई यांनी दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, ग्रामपंचायत सुकापूर ता साक्री जि धुळे येथील ग्रामसेवक श्री ए एम ठाकरे कडून माहिती अधिकार कार्यकर्ता धनराज व्ही निकम यांनी दि 05/03/2019 रोजी माहितीच्या अधिकारात अर्ज सादर करून 14 वा वित्त आयोगाची माहिती मागणी केलेली होती.सदर माहिती 30 दिवसात न मिळाल्याने प्रथम अपील सादर केले होते.प्रथम अपिलीय आदेशानुसार माहिती न मिळाल्याने अपिलार्थी श्री निकम यांनी दुसरे अपील राज्य माहिती आयोग , खंडपीठ नाशिक यांच्या स्तरावर दुसरे अपील दाखल केले होते. त्या अनुषंगाने दि 27/11/2020 रोजी सदर सुनावणी होऊन संबंधितांकडून शास्तीची कार्यवाही का करू नये म्हणून खुलासा मागविण्यात आलेला होता.सदर त्यांचा दिनांक 08/02/2021 रोजी चा खुलासा अमान्य करण्यात आला आहे. व त्यांचा विरोधात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20(1) अन्वये रुपये 5000/- (रु पाच हजार मात्र ) शास्तीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.सदर शास्तीची रक्कम म सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय साक्री यांनी तत्कालीन ग्रामसेवक ग्रा प सुकापूर श्री ए एम ठाकरे यांच्या वेतनातून समान 2 मासिक हप्तात कपात करून माहिती अधिकार च्या लेखाशीर्षात जमा करण्याची कार्यवाही करावी असे देखील आदेशात नमूद केले आहे.सदर यासंदर्भात कमी स्वरूपाची शास्ती करण्यात आली असून संबंधितावर रु 25 हजारांची शास्ती करून शिस्तभंगाची कार्यवाही करायला हवी होती असे मत माहिती अधिकार कार्यकर्ता धनराज निकम यांनी व्यक्त केले आहे.