लोणखेडा-पुरुषोत्तमनगर रस्ता मोजतोय अखेरच्या घटका..सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.




 लोणखेडा-पुरुषोत्तमनगर रस्ता मोजतोय अखेरच्या घटका..सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.


शहादादि.२९(प्रतिनिधी) तालुक्यातील लोणखेडा ते डोंगरगाव, पुरुषोत्तमनगर ते सावखेडा या नऊ किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.तालुक्याला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यालगत शाळा, कॉलेज, बँक, सहकारी पतपेढी, खासगी व शासकीय दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय ,औद्योगिक प्रकल्प व मुख्य बाजारपेठ असल्याकारणाने दहा ते वीस खेड्यांतील नागरिकांचा नित्यनेमाने संपर्क असतो. तसेच डोंगरगाव येथील गौणखनिज, रस्ते व महामार्ग निर्मितीसाठी असलेला ठिय्या यांची अवजड वाहने याच रस्त्याने वाहतूक करीत असतात. या वाहनातून रेती, खडी, मुरूम, काँक्रीट तयार माल हे रस्त्यावर पडत असल्याने संपूर्ण रस्ता गौण खनिजाने झाकला गेलाय. सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना यांच्याकडून गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी स्वखर्चाने केली जाते. परंतु तीही काही दिवसांत जैसे थे परिस्थिती असते. सध्या रस्त्यावर पायी जाणेसुद्धा कठीण झाले आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहन पंचर होते. छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहे. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हे रस्ते पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतोय. या अवस्थेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. मुख्य आंतरराष्ट्रीय महामार्गास जोडणारा हा रस्ता असून, नेहमीच सर्वपक्षीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची या रस्त्यावरून कायमची वर्दळ असते. परंतु गेल्या दोन वर्षापासून रस्ता दुर्लक्षित झाल्याने रस्त्यावर मोठमोठे खडे पडले आहेत. छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.प्रशासनाने याची दखल घेऊन रस्त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने