संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण - डॉ. मिलींद निकुंभ क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव व जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे पोषण माहच्या निमित्त वेबिनारचे आयोजन





 संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण - डॉ. मिलींद निकुंभ क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोजळगाव व जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे पोषण माहच्या निमित्त वेबिनारचे आयोजन

        जळगाव, दि. 18(प्रतिनिधी):- परिपूर्ण पोषणासाठी संतुलित आहार अत्यंत महत्वाचा असतो. आपल्या आहारात षडरसांचा समावेश असेल तर तो परिपूर्ण ठरतो आणि शरीरासाठीही पोषक होतो. असे प्रतिपादन जळगावच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद निकुंभ यांनी केले. ते भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातंर्गत कार्यरत क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव तर्फे पोषणासाठी योग आणि आयुष विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. पोषण माहच्या निमित्ताने जिल्हा परिषद, जळगावच्या सहकार्याने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

            डॉ. निकुंभ पुढे म्हणाले की, शरीराचे वय आणि अवस्थेनुसार आहारात समुचित बदल केले तर कोणत्याही वयात माणूस निरोगी राहू शकतो. यावेळी बोलताना एम जे कॉलेजच्या सोहम योग आणि निसर्गोपचार विभागाच्या माजी संचालिका डॉ आरती गोरे म्हणाल्या की, कोणताही आजार झाल्यावर त्याच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या चिकित्साप्रणाली महत्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा आजार होऊच नये यासाठी योग आणि निसर्गोपचाराची मदत घेतली तर अधिक उत्तम. निरोगी आयुष्यासाठी फक्त आहाराच नाही तर विहार आणि विचार ही तेवढेच महत्वाचे आहे. अष्टांग योगाच्या अनुपालनाने माणूस मन आणि शरीर दोन्ही निरामय आणि निरोगी राखून उत्तम आयुष्य जगू शकतो.

            या वेबिनारमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प, जळगाव जिल्ह्याच्या पर्यवेक्षिका शितल निंबाळकर व चाळीसगाव तालुक्याच्या राजदेहेरे गावच्या अंगणवाड़ी सेविका सरला देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे म्हणाले की, मागील दिड वर्षात कोविडच्या महामारीमुळे सर्वांना आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याचे महत्व पटले आहे. पोषण चांगले असेल तरच प्रतिकारशक्ती चांगली असू शकते. पोषणाला जर आपण योग आणि पर्यायी पारंपरिक चिकित्सा पद्धतींची जोड दिली तर आपण कोणत्याही आजाराला समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. वेबिनारचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहायक क्षेत्रीय अधिकारी प्रदीप पवार यांनी केले.

            पत्र सूचना कार्यालय, मुंबई व प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश) चे सर्व जिल्ह्यातील अधिकारी, यूनिट इन्चार्ज आणि कर्मचारी, अंगणवाड़ी सेविका, मदतनीस, आशा, बचतगटाचे सभासद व इतर लाभार्थी या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते. हे वेबिनार यूट्यूबवर उपलब्ध आहे. इच्छुकांना https://www.youtube.com/watch?v=pPnGPN2cwGY या लिंकवर हे वेबिनार बघता येईल याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रिय लोकसंपर्क ब्यूरो, जळगावतर्फे करण्यात आले आहे.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने