मुलगी हरवल्याची पोलिसात फिर्याद, मात्र मुलीचा मृतदेह घरात?


 

मुलगी हरवल्याची पोलिसात फिर्याद, मात्र मुलीचा मृतदेह घरात? 


अमरावती दि.२९:

अमरावती जिल्ह्यातील एका मुलीच्या नातेवाइकांनी आपली मुलगी हरवल्याची पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, मात्र दोन दिवसांनी त्याच मुलीचा मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात असणाऱ्या काटी गावात सदरची घटना घडली आहे. एका कुटुंबातील १६ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबातील व्यक्तीने पोलिसात दिली होती. मात्र दोन दिवसानंतर सदर युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह घरातच आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

सदर युवतीने गळफास घेऊन आत्महत्या का केली ? या कारणांचा  उलगडा मात्र अद्यापही झालेला नाही. सदर घटनेचा तपास बेनोडा पोलिस करित आहेत. आत्महत्या केलेल्या १६ वर्षीय युवतीचे नाव, रागिनी रत्नाकर कुटे असे असून, तिचे वय सोळा वर्ष आहे. मयत रागिनी ही २० जुलै रोजी सकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला होता, मात्र ती कुठेही न सापडल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र गुरुवारी मयत रागिनीचे चुलते घरातील धाब्यावर लोखंडी तार आणण्यासाठी गेले असताना, तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दगडाच्या पायरीवर आढळून आला आहे. 

त्यांनी यासंदर्भात लगेच कुटुंबातील व्यक्तींना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबाने सदर घटनेची माहिती बेनोडा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलीस घटनास्थळी येऊन, त्यांनी सदर मृतदेहाचा पंचनामा केला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. मयत रागिनीने आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस करित आहेत.  रागीनीने आत्महत्या केली नाही तर.. हा घातपात करण्यात आला असावा अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने