*जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे निमित्त साधून केले वृक्षारोपण..*
नाशिक दि.२८( जिल्हा प्रतिनिधी सुनीलअण्णा सोनवणे) जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने चांदवड येथील सुमित प्रफुल्ल सोनवणे याने चांदवडच्या डोंगरावर असलेल्या सुप्रसिद्ध श्री चंद्रेश्वर महादेव मंदिराच्या परीसरात वृक्षारोपण केले.
सुमित हा पुण्याच्या निगडीत असलेल्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे इयत्ता ९ वीच्या वर्गात गुरुकुल विभागात शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या काळात सध्या चांदवड येथील घरूनच तो ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहे. चांदवड शहराची ओळख त्यातील वडाच्या झाडांनीच होती आणि तीच ओळख डोळ्यासमोर तुटून पडताना पाहिले तेव्हा तो खूपच अस्वस्थ होता. निसर्गाचे आपण संवर्धन करावे, सर्वांनीच वडाची झाडे लावून पुन्हा चांदवड हे नाव सार्थ ठरवावे असे त्याला नेहमीच वाटत होते त्यात आपला खारीचा वाटा असावा या सकारात्मक दृष्टीकोनातून त्याने वडाच्या झाडांचे रोपण केले. यासाठी त्याचे वडील प्रफुल्ल सोनवणे, आई सौ. अश्विनी सोनवणे व यादव ठाकरे, बाळा पाडवी व चंद्रेश्वर भक्त मंडळ यांनी प्रोत्साहन दिले.
सर्वांनी निसर्ग दिनाच्या निमित्ताने निसर्गाचे संवर्धन करावे हा संदेश सर्व नागरिकांना त्याने आपल्या उपक्रमातून दिला.