संविधान साक्षरता काळाची गरज - प्रा. डॉ. राहुल निकम ♦️समाजकार्य महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

 संविधान साक्षरता काळाची गरज - प्रा. डॉ. राहुल निकम 

♦️समाजकार्य महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम 

   


   चोपडा दि.१६(प्रतिनिधी)भारतीय संविधान या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे असून ग्रामपंचायती पासून तर लोकसभेपर्यंतचा सर्व कारभार भारतीय संविधानाच्या माध्यमातून चालत आहे.भारतीय संविधानात च्या माध्यमातून मिळालेल्या हक्क आणि अधिकारांमुळे देशभरातील सर्वच नागरीक आज सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत. संविधानाच्या उद्देशिकेत संपूर्ण संविधानाचे प्रतिबिंब  सामावलेले असून संविधानाची उद्देशिका समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्रा. डॉ. राहुल निकम यांनी नूतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चुंचाळे तालुका चोपडा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

           भारतीय संविधान विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून समाजकार्य महाविद्यालय चोपडा आणि नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चुंचाळे तालुका चोपडा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालयाचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते संजय नारायण महाजन हे होते. यावेळी विचारपीठावर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक पी एस अहिरे, अविनाश संदानशिव, अनिल बाविस्कर आदी मान्यवर हजर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान निर्माते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना  डॉ राहुल निकम यांनी  विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेतील शब्दांचे सविस्तर अर्थ समजावून सांगितले. संविधाना सोबत सेल्फी घेण्याचे आवाहन देखील केले. 

              कार्यक्रमाची प्रास्ताविक अनिल बाविस्कर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आजच्या काळातील संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संविधान गीत सादर केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना संजय महाजन यांनी संविधानाची उपयोगिता सर्वांना समजावून सांगितली. संविधानामुळेच आपल्या देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून आपला भारत देश एका सूत्रात असल्याचे मत त्यांनी मांडले. 

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक जे यु सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर सौंदाणकर, क्षेत्रकार्य पर्यवेक्षक प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश संदानशिव यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने