पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची क्रिकेट व कॅरम स्पर्धेत विभागस्तरावर झेप
चोपडा,दि.१७(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे तथा जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय शासकीय क्रिकेट स्पर्धेत पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चोपडाच्या 19 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत जिल्हा विजेतेपद पटकावले आणि विभागस्तराव झेप घेतली
अंतिम सामन्यात अमळनेर च्या संघाचा तब्बल 09 गडी राखून पराभव करत संघाने स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. या दिमाखदार विजयासह मुलींच्या संघाने आता विभागस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.
संघाच्या या यशामुळे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे, उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे आणि प्रभावी मार्गदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत आपल्या संघाने निर्धारित 5 षटकांत 74 धावा केल्या. आपल्या शाळेच्या रुचिकाने 30 चेंडूंत 27 धावा, श्रावणीने ने 24 चेंडूंत नाबाद 18 धावा केल्या. गोलंदाजी करत श्रावणी, रुचिका, हर्षिता, दिव्या व तेजस्विनीने अमळनेरच्या संघावर आपल्या प्रभावी गोलंदाजीचा जोरावर 05 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स घेतल्या.
कर्णधार श्रावणी अजय सैंदाणे आणि रुचिका समाधान पाटील यांनी जबरदस्त फलंदाजी करत 75 धावांचे लक्ष्य अमळनेर संघाला दिले.
संपूर्ण सामन्यात फलंदाजांनी दाखवलेला आत्मविश्वास, धावगती कायम राखण्याची क्षमता आणि एकमेकांना दिलेली उत्तम साथ यामुळे चोपडाच्या संघाने जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांना मागे टाकत विजेतेपद मिळवणाऱ्या पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय च्या संघाने आता विभागस्तरीय स्पर्धेकडे आगेकूच केली आहे. जिल्ह्यातील सर्वोत्तम संघ म्हणून नाव मिळवल्यानंतर विभागस्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
संघाच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव, सांघिक भावना आणि विजयाची जिद्द यांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, मुलींच्या क्रिकेट संघाने अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, या यशामुळे आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे.
कॅरम स्पर्धेतही इयत्ता 12 वी सायन्स चा विद्यार्थी अनिकेत समाधान पाटील याने जिल्हास्तरावर आपल्या एकाग्रतेच्या व कौशल्य पूर्ण खेळाने नेत्रदिपक कामगिरी करत विभागस्तराव झेप घेतली आहे. क्रिकेट व कॅरम च्या विजयी संघाला प्रा. अजय सैंदाणे यांचे मार्गदर्शन लाभले
या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश पंडित बोरोले, विद्यमान अध्यक्ष पंकज भैया बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, सचिव गोकूळ भोळे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा विभाग आणि पालकवर्ग यांनी खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक केले व आगामी विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
