चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांनी घेतली ‘आधुनिक दुर्गां’ची मुलाखत!
चोपडा,दि.१७ (प्रतिनिधी):विवेकानंद विद्यालय प्राथमिक विभाग, चोपडा येथे शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘आधुनिक दुर्गा मुलाखत’ हा स्तुत्य व नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत इयत्ता चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्त्या, डॉक्टर, संस्थाचालक, मुख्याध्यापिका आणि महिला शेतकरी अशा विविध क्षेत्रांतील ‘आधुनिक दुर्गां’ना बोलते करत त्यांच्या मुलाखती घेतल्या.
सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई पाटील यांची मुलाखत राजवी शिंदे, निधी बडगुजर, उन्नती पाटील व निशांत न्यायदे यांनी घेतली. मुलाखतीतून सामाजिक कार्याचे महत्त्व, समाजसेवेची प्रेरणा आणि महिलांचे समाजातील योगदान याविषयीची माहिती समोर आली.
डॉ.तृप्ती पाटील यांची मुलाखत ऋतुजा मोरे, पूर्वेश महाजन, आराध्या पाटील व देवांश वैद्य यांनी घेतली. मुलाखतीतून आरोग्यसेवेचे महत्त्व, रुग्णसेवा आणि डॉक्टरांची समाजाप्रती असणारी जबाबदारी याबाबत मार्गदर्शन मिळाले.
संस्थापक डॉ.विकास हरताळकर यांची
रोनित पाटील, मनन बारेला, कनिष्क अग्रवाल व दुष्यंत शिंदे यांनी मुलाखत घेऊन शैक्षणिक संस्थांचे कार्य, शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत माहिती जाणून घेतली.
मुख्याध्यापिका भारती पंजाबी यांची
नम्रता महाजन, जवेरीया बागवान, समर्थ धनगर व रितेश पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शिक्षकांची भूमिका यावर प्रकाश टाकला गेला.
तर महिला शेतकरी वृषाली देशमुख यांची
आस्था भार्गव, आरोही पाटील, लक्ष पाटील व पार्थ शिरसाठ या विद्यार्थ्यांनी मुलाखत घेऊन बळिराजाचे कष्ट आणि शेती क्षेत्रातील महिलांचे मोलाचे योगदान समजून घेतले.
‘स्त्रीशक्तीचा सन्मान आणि कर्तृत्ववान महिलांकडून प्रेरणा’ हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या बाल-पत्रकारांच्या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता, संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढीस लागला. तसेच समाजातील यशस्वी महिलांविषयी आदराची भावना निर्माण झाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्त्रीशक्ती, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ मिळाला.
या उपक्रमाची यशस्वी जबाबदारी शिक्षिका मेघा पाटील, शुभांगी बोरसे आणि सुषमा पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते व संजय सोनवणे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व स्तरांतून बालकांचे आणि शाळेचे कौतुक होत आहे.
