हवामान बदलाच्या काळात कृषी पर्यटन उद्योग ग्रामीण शेतीसाठी वरदान : प्रा. डॉ. शिवाजी पाटील

 हवामान बदलाच्या काळात कृषी पर्यटन उद्योग ग्रामीण शेतीसाठी वरदान : प्रा. डॉ. शिवाजी पाटील

चोपडा,दि.३०(प्रतिनिधी) : बदलते हवामान, कृषी व्यवसायासमोरील वाढती आव्हाने आणि घटते उत्पन्न या पार्श्वभूमीवर शाश्वत कृषी विकासासाठी कृषी पर्यटन हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे प्रतिपादन कृषी पर्यटन कार्यशाळेत करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या ज्ञानविस्तार उपक्रमांतर्गत तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व जल-वृक्ष-वसुंधरा पूजनाने झाली. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी प्रास्ताविकातून कृषी क्षेत्रापुढील सद्यस्थितीतील आव्हानांचा वेध घेतला. हवामान बदल आणि घटते कृषी उत्पन्न यांमुळे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे पूरक व शाश्वत साधन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात कृषी पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, या व्यवसायाबाबत जनजागृती व्हावी आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील संधींची माहिती मिळावी, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा म्हसदी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर मनोगतात प्रा. डॉ. पाटील यांनी कृषी पर्यटन ही संकल्पना आणि त्यातून विकसित होणारा उद्योग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी, निसर्ग, ग्रामीण संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जोडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची क्षमता कृषी पर्यटनात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या विविध सत्रांमध्ये तज्ज्ञांनी कृषी पर्यटनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर मार्गदर्शन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. के. शेलार यांनी ‘महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग’ या विषयावर उपयुक्त माहिती सादर केली. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील संधी आणि ग्रामीण पर्यटनाशी संबंधित शक्यता यांचा त्यांनी आढावा घेतला.

तिसऱ्या सत्रात मार्गदर्शक डॉ. नंदिनी वाघ यांनी ‘कृषी पर्यटन धोरणे व शासकीय अनुदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बाबी आणि शासनाच्या विविध सहाय्य योजनांची माहिती त्यांनी दिली. तर चौथ्या सत्रात डॉ. अजय पाटील यांनी ‘कृषी पर्यटन : शाश्वत विकासाचा मार्ग’ या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगारनिर्मिती, ग्रामीण विकास आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळू शकते, यावर त्यांनी भर दिला.

समारोप सत्रात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यशाळेबाबत आपली मनोगते व्यक्त केली. सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश अलिझाड यांनी कृषी व्यवसायाशी संलग्नित विविध उद्योग उभारणीविषयी प्रतिपादन केले. श्री. पी. एस. पाडवी यांनी दुर्गम व पर्वतीय भागातील कृषी पर्यटन विषयाची विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी कृषी व्यवसाय हा देशाचा आर्थिक कणा असून कृषी पर्यटन हा शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी महत्वाचा दुवा ठरणारा आहे. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील व सचिव स्मिताताई संदीप पाटील यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ, रजिस्ट्रार डी. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. संगीता भोसले यांनी आभार प्रदर्शन केले, तर सूत्रसंचालन डॉ. मुकेश पाटील यांनी केले. डॉ. मोतीराम पावरा, संदीप जी. पाटील, रुपेश पाटील, मयुरी पाटील, दामिनी पाटील, रविंद्र पाटील यांनी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने