चोपड्यात डिसेंबरमध्ये होणार शिक्षक साहित्य संमेलन, मसाप तर्फे आयोजन
चोपडा,दि.१७(प्रतिनिधी) - महाराष्ट्र साहित्य परिषदे, पुणेच्या चोपडा शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी मंचावर शाखेचे कार्याध्यक्ष विलास पी. पाटील, प्रमुख कार्यवाह संजय बारी, कोषाध्यक्ष योगेश चौधरी, विश्वस्त मंडळाचे कार्यवाह श्रीकांत नेवे, विश्वस्त रमेश शिंदे, पंकज बोरोले हे होते. पंकज विद्यालयात झालेल्या या सभेत विषय पत्रिकेवरील विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनियुक्त केंद्रीय कार्यकारिणीच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच शाखेच्या आर्थिक उत्पन्न वाढीच्या विविध स्त्रोतांवर व उपक्रमांवर तसेच नांदी संमेलनाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेत विलास पाटील, श्रीकांत नेवे, पंकज बोरोले, जयश्री चव्हाण, योगेश चौधरी, संदीप पाटील, पंकज शिंदे यांनी सहभाग घेतला. सभेचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी, तर अहवाल वाचन गौरव महाले यांनी व आर्थिक पत्रकाचे वाचन योगेश चौधरी यांनी केले.
@चोपड्यात डिसेंबर मध्ये होणार शिक्षक साहित्य संमेलन@
पुढील वर्षी पुणे येथे होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभर होणाऱ्या ९९ नांदी संमेलनांपैकी एक संमेलन चोपडा शाखेतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. ४ डिसेंबर रोजी चोपडा येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे विविध संस्थांच्या सहयोगाने एक दिवसीय जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या नांदी संमेलनाच्या आयोजनाबाबत विविध समित्या व संमेलनाचे स्वरूप याबाबत चर्चा करण्यात आली.
