चोपड्यात पाचव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; गुलालाने माखलेल्या रस्त्याची पालिकेकडून विशेष स्वच्छता.. १० टॅक्टर ट्राॅली गोळा

 चोपड्यात पाचव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप;  गुलालाने माखलेल्या रस्त्याची  पालिकेकडून विशेष स्वच्छता.. १० टॅक्टर  ट्राॅली गोळा 





चोपडा दि.१९(प्रतिनिधी)​: दरवर्षीप्रमाणे यंदाही चोपड्यात पाचव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात व अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात "बाप्पा " निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 'च्या जयघोषात कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेश मूर्ती विसर्जन शांततेत पार पडले. शहरातील सर्वच गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक एकाच मार्गाने जात असल्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यंदा मागील वर्षापेक्षा अधिक आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मागील काही काळात चोपडा शहरातील गणेशोत्सव संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत खास ठरत आहे. गणपती आगमन सोहळ्यापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंतच्या भव्य उंच मूर्ती आणि गुलालाची तुफान उधळण यामुळे चोपड्याच्या गणेशोत्सवाला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

​ *रस्ते माखले गुलालाने ;* 

विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या गुलालाच्या उधळणीमुळे शहरातील मुख्य रस्ते पूर्णपणे गुलालाने माखले होते. मिरवणूक पार पडल्यानंतर चोपडा नगर परिषद प्रशासनाने शहरात तातडीने व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली. 

​नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्ष​नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक राठोड आणि स्वच्छता निरीक्षक सौ. दीपाली साळूंके व निरिक्षक जयेश भोंगे यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेचे कंत्राटी व कायमस्वरूपी मिळून सुमारे ७० ते ८० कर्मचारी पहाटे ४ वाजेपासूनच झाडू आणि ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले. 

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या  अथक प्रयत्नांमुळे अवघ्या काही तासांतच सुमारे ८ ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यात आला. उर्वरित भागातून अजून ३ ते ४ ट्रॅक्टर गुलाल गोळा होण्याचा अंदाज असून, एकूण १० ते १२ ट्रॅक्टर गुलालाची विल्हेवाट लावली जात आहे.यंदाच्या मिरवणुकीत ​पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि नगर परिषदेची ही तत्पर स्वच्छता मोहीम यामुळे चोपडकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने