पर्यावरण संवर्धनाचा जागर… भक्ती, संस्कृतीचा संगम! पंकज विद्यालय उत्साहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव संपन्न

 पर्यावरण संवर्धनाचा जागर… भक्ती, संस्कृतीचा संगम! पंकज विद्यालय उत्साहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव संपन्न

चोपडा,दि.१९(प्रतिनिधी) : पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या प्रेरणेतून व पंकज विद्यालय चोपडा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “एक शाळा – एक पर्यावरणपूरक गणपती” या संकल्पनेतून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची विधिवत स्थापना डॉ सुरेश बोरोले व सौ हेमलता बोरोले यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी संपूर्ण गणेशोत्सवात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आकर्षक सेल्फी पॉईंट, संदेश देणारी रांगोळी, पर्यावरणपूरक सुशोभन, संदेश फलक यांची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, स्वच्छता व वृक्षसंवर्धनाचे संदेश देणारे फलक तयार करून जनजागृती केली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, कागदी बुके तयार करणे आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कागदी बुकेमधून प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक सजावटीचा संदेश देण्यात आला. नियमित 

गणेशोत्सवातील आरतीमध्ये पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने पारंपरिक वादनातून वातावरणात उत्साह निर्माण केला. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडविले.

या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच गणेशोत्सवातून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचा योग्य वापर करण्यासाठी सेंद्रिय खत निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणपूरक पद्धतीने विद्यालयाच्या परिसरातच गणेश विसर्जन करण्यात आले.

गणेश विसर्जनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, पारंपरिक नृत्य व विविध सांस्कृतिक सादरीकरणांसह भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक विशेष आकर्षण ठरले.

या संपूर्ण उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे केलेले तालबद्ध नृत्य. शिक्षक-विद्यार्थी-कर्मचारी यांच्या या उत्स्फूर्त सहभागाने गणेशोत्सवात एकात्मता, आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या पर्यावरणपूरक गणेशोत्सवामागे दादासाहेब डॉ. सुरेश बोरोले यांची प्रेरणा असून श्री. पंकज बोरोले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक जबाबदारी, सांस्कृतिक मूल्ये आणि सामूहिक सहभागाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर उत्साहात पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था परिवाराच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.

“भक्ती असावी मनात, पर्यावरणाची जपणूक असावी कृतीत” हा संदेश देत पंकज विद्यालय चोपडा येथे साजरा झालेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी आनंद, संस्कार, कला आणि पर्यावरण जनजागृती यांचा सुंदर संगम ठरला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने