गीता अभ्यासातून घडतील मूल्याधिष्ठित नागरिक : गोविंदभाई गुजराथी

 

गीता अभ्यासातून घडतील मूल्याधिष्ठित नागरिक : गोविंदभाई गुजराथी 


चोपडा ,दि.१०(प्रतिनिधी) : एज्युकेशन सोसायटी  संचलित,शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ, श्रीक्षेत्र जाळीचा देव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय श्रीमद्भगवद्गीता ज्ञान स्पर्धा परीक्षा  उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली. या परीक्षेत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने ऐच्छिक सहभाग नोंदविला. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमद्भगवद्गीतेच्या अभ्यासामुळे मनाला स्थैर्य मिळून संयम, धैर्य, विश्वास, समानता, कृतज्ञता आणि मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा मिळते. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सुसंस्कृत व मूल्यनिष्ठ नागरिक घडणे आवश्यक असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी गीतेचा अभ्यास करावा, गीतेचे जीवनातील महत्त्व अनन्य साधारण आहे . राजकीय, सामाजिक, व्यावहारिक, कौटुंबिक, वैज्ञानिक, शैक्षणिक व धार्मिक अशा विविध क्षेत्रांसाठी गीता मार्गदर्शक ठरते. जीवनातील विविध संघर्षांतून मार्ग काढत विकासाच्या पायऱ्या चढण्यासाठी गीतेतून सामर्थ्य मिळते, असे प्रा. डॉ . सविता जाधव त्यांनी आपल्या  प्रास्ताविकातून सांगितले.

 महान ग्रंथांचे वाचन करा

परीक्षेचे उद्घाटन संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी रामायण, महाभारत व गिता यांसारखे महान ग्रंथ आपल्याला जीवनाचे ज्ञान व संस्कार देतात. श्रीमद्भगवद्गीतेत जीवनाचे सार सामावले असून विद्यार्थ्यांनी या ग्रंथाचा अभ्यास करून त्यातील चांगल्या विचारांचे आचरण करावे,प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हे भावी शिक्षक असल्याने त्यांच्या हातून अनेक पिढ्या घडणार आहेत. त्यामुळे त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व मूल्ये भावी पिढीच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरतील, असे त्यांनी नमूद केले.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी मन लावून व सखोल अभ्यास करावा, या उद्देशाने सुलभ मराठी सिद्धांत ग्रंथावर आधारित वस्तुनिष्ठ पद्धतीने या ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षेच्या केंद्रप्रमुख प्रा. डॉ. सविता जाधव, तर संपर्कप्रमुख ग्रंथपाल श्री. एम. एल. पटेल यांनी जबाबदारी सांभाळली.यावेळी आय.क्यू.ए.सी. समितीचे सदस्य श्री. डी. टी. महाजन, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री. किरण पाटील, ज्येष्ठ प्रा.श्री. एम. पी. पाटील, प्रा. एन. डी. वाल्हे, प्रा.श्री. संजय देशमुख, प्रा.श्री. सुजय धनगर, कला शिक्षिका प्रा.श्रीमती मीनल पाटील, प्रा.रश्मी शेख, श्री. दीपक विसावे, प्रा.पूजा माळी, शुभम गुजराथी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुजय धनगर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने