गलवाडे च्या संदीप देसले यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर,१ जुलैला मुंबईत वितरण
चोपडा,दि. 25(प्रतिनिधी) तालुक्यातील गलवाडे येथील प्रयोगशील युवा शेतकरी संदीप शिवाजी देसले यांना 2024 चा कृषी विभागामार्फत दिला जाणारा नाशिक विभागातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. एक जुलै रोजी मुंबई तील वरळी मधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते राज्यभरातील पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
संदीप देसले गेली अनेक वर्षे शेतीत विविध प्रयोग करत असून त्यांना यापूर्वीही वेगवेगळ्या संस्था व संघटनांमार्फत त्यांना कृषिथॉन,खानदेश कृषी सम्राट आदी पुरस्कार मिळालेले आहेत. सेंद्रिय भेंडी एक्स्पोर्ट केल्याने जिल्ह्याच्या आत्मा समितीनेही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवले आहे. शेतातील वेगवेगळी नाविन्यपूर्ण पिके यशस्वीरित्या कशी घ्यावी याचा एक चांगला आदर्श त्यांनी युवकांसमोर ठेवला आहे. देसले यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याने त्यांचे तालुका भरातील विविध पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
