अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी चोपडयाच्या सलमान खानला 5 वर्षे सक्तमजुरी; अमळनेर कोर्टाचा निकाल..चोपडा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
चोपडा दि.२५(प्रतिनिधी)अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी सलमान खान अकबर खान यास 5 वर्षे सक्तमजुरी व 5,100 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश क्र. 1, अमळनेर यांनी 25 जून 2026 रोजी हा निकाल दिला.
10 वर्षीय मुलीवर अत्याचार
25 ऑक्टोबर 2024 रोजी 10 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या विनयभंग व अत्याचाराच्या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 348/2024 दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता कलम 74, 76(2), 332(क), पोक्सो अधिनियम कलम 7, 8 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 3(1)(W)(1)(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
आरोपीला 5 वर्षे सक्तमजुरी
या प्रकरणी स्पेशल केस क्र. 50/2024 मध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपी सलमान खान अकबर खान, वय 26, रा. हमीद नगर, चोपडा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 65, 103(2) तसेच पोक्सो अधिनियम कलम 4, 5, 6 व 5(u) अन्वये गुन्हा सिद्ध झाला. त्यानुसार न्यायालयाने त्याला 5 वर्षे सक्तमजुरी, 5,100 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
*पोलिसांची तत्पर कारवाई*
सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसले यांनी प्रकरणाची मालिका बजावली. साक्षीदारांना वेळोवेळी न्यायालयात हजर करून प्रभावी साक्ष देण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा विभाग श्री. चव्हाण व श्री. सोनावणे यांनी केला, तर तपासदरम्यान संपूर्ण व प्रभावी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोजक श्री. के. आर. बागुल यांनी प्रभावीपणे कामकाज पाहून युक्तिवाद केला.
अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस कटीबद्ध आहेत. या निकालामुळे गुन्हेगारांना कडक संदेश गेला असून बालकांच्या सुरक्षिततेबाबत समाजाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
