योग, राष्ट्रसेवा आणि गौरवाचा संगम; वर्डीतील विद्यालयात दुहेरी सोहळा

 योग, राष्ट्रसेवा आणि गौरवाचा संगम; वर्डीतील विद्यालयात दुहेरी सोहळा 

चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) तालुक्यातील वर्डी येथील स्वा.सै.श्री. शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘योग संगम-२०२६’ कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन आदरणीय श्री हरिश्चंद्र शामराव चव्हाण यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. क्रीडा शिक्षक श्री पी. जी. पाटील यांनी योग प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून पूरक हालचाली करून घेत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धहलासन, अर्धचक्रासन, शशांकासन, मंडुकासन, वक्रासन, उष्ट्रासन, मयूरासन, भुजंगासन, वज्रासन, पवनमुक्तासन, पादहस्तासन व शवासन आदी आसनांचा समावेश होता. तसेच या आसनांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण यांनी अनुलोम-विलोम, कपालभाती, उज्जयी, शीतली व भ्रामरी प्राणायामांचे प्रात्यक्षिक करून प्राणायामाचे महत्त्व विशद केले.


याच प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन श्री हरिश्चंद्र शामराव चव्हाण यांच्या हस्ते गावातील नवनियुक्त अग्निवीर तरुणांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रचंड जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. गावातील हर्षल कांतीलाल पाटील, वैभव ज्ञानेश्वर सुलताने, मनोज कैलास पाटील, जयेश सुनील पाटील, मोहित संजय धनगर, भावेश अनिल धनगर, सचिन प्रकाश धनगर, योगेश वसंत साळुंखे, हर्षल शमकांत पाटील, शत्रुघ्न रवींद्र पाटील व सागर मूलचंद कोळी या एकूण अकरा तरुणांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली असून, उपस्थित अग्निवीर व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी खा. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पवार, पर्यवेक्षक श्री आर. बी. साळुंखे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अग्निवीरांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने