हातेड जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या केंद्रप्रमुखपदी संदीप बाविस्कर यांची निवड
चोपडा दि.१९(प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वराड येथील पदवीधर शिक्षक श्री. संदीप अशोक बाविस्कर (घोडगावकर) यांनी केंद्रप्रमुख पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत जि. प. केंद्र शाळा, हातेड येथे केंद्रप्रमुख पदी निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे घोडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी नेतृत्व यासाठी ओळख असलेल्या श्री. बाविस्कर यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची केंद्रप्रमुखपदी झालेली निवड ही त्यांच्या गुणवत्तेची, सेवाभावाची आणि परीक्षेतील यशाची पोचपावती मानली जात आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावेल, शिक्षकांना प्रभावी मार्गदर्शन मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच घोडगाव ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
