चोपडा येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'स्मार्ट पोर्टेबल पेन' उपकरण डिझाईनला भारत सरकारचे पेटंट मंजूर!
♦️तिघा प्राध्यापकांचे क्रांतिकारी संशोधन; हस्तलेखनातील चुका आता पेनच दुरुस्त करणार
चोपडा,दि.३(प्रतिनिधी) :येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी संशोधनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील मराठी व हिंदी विभागाच्या प्राध्यापकांनी एकत्रितपणे विकसित केलेल्या "स्मार्ट पोर्टेबल पेन फॉर रिअल-टाइम रायटिंग करेक्शन" (Smart Portable Pen for Real-Time Writing Correction) या नाविन्यपूर्ण उपकरण डिझाईनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत मान्यता (पेटंट) मिळाली आहे.
या महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी संशोधनात दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर एन. सोनवणे, उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल बी. सूर्यवंशी आणि मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे या प्राध्यापकांचा मोलाचा सहभाग आहे.
काय आहे हे 'स्मार्ट पोर्टेबल पेन' उपकरण?
सध्या डिजिटल साधनांवर (कॉम्प्युटर किंवा मोबाईल) स्पेलिंग आणि व्याकरण दुरुस्त करणारे अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. मात्र, कागदावर हाताने लिहिताना (हस्तलेखन) अशी कोणतीही मदत मिळत नाही. हीच अडचण ओळखून या तिन्ही प्राध्यापकांनी कागदावर लिहितानाच तातडीने चुका दुरुस्त करणारे एक स्मार्ट उपकरण (पेन) चे डिझाइन विकसित केले आहे. हे उपकरण विद्यार्थी, भाषा शिकणारे आणि लेखनविषयक दिव्यांगत्व (writing disabilities) असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत वरदान ठरणार आहे.
डिझाईन उपकरणाची वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती:
• अधूनमधून अचूक तपासणी (OCR व NLP तंत्रज्ञान): या पेनमध्ये 'ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन' (OCR) मॉड्यूल, मोशन व प्रेशर सेन्सर्स आणि 'नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग' (NLP) इंजिन बसवले आहे. वापरकर्ता जसे कागदावर लिहितो, तसे हे पेन मजकुराचे डिजिटल विश्लेषण करते.
• चूक झाल्यास त्वरित इशारा: लिहिताना स्पेलिंग, व्याकरण किंवा वाक्यरचनेत काही चूक झाल्यास, हे उपकरण पेनमधील व्हायब्रेशन मोटर किंवा एलईडी (LED) इंडिकेटरद्वारे वापरकर्त्याला कोणतीही अडचण न आणता त्वरित अलर्ट (इशारा) देते.
• आधुनिक डिझाइन आणि कनेक्टिव्हिटी: हुबेहूब सामान्य पेनसारख्या दिसणाऱ्या या उपकरणाला पकडण्यासाठी सोयीस्कर (ergonomic) आकार दिला आहे. यात ग्रीपजवळ एक 'ओलेड' (OLED) डिस्प्ले, चार्जिंगसाठी युएसबी-सी (USB-C) पोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
• स्मार्ट ॲप्लिकेशन जोडणी: हे पेन मोबाईल किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशनशी जोडता येते. ज्यामुळे वापरकर्त्याला आपल्या चुकांचे पुनरावलोकन करणे आणि प्रगतीचा आलेख पाहणे सोपे होते. यात गरजेनुसार 'केवळ स्पेलिंग' किंवा 'पूर्ण व्याकरण' तपासणी निवडण्यासाठी एक 'मोड selector' बटणही दिले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान
डिजिटल उपकरणांना मर्यादा असलेल्या किंवा बंदी असलेल्या परीक्षा आणि वर्गाच्या वातावरणात हे उपकरण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भाषा सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ग्रामीण आदिवासी भागाच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करून पेटंट मिळविल्याबद्दल चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ व दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.संध्या एम.सोनवणे, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ व रजिस्ट्रार डी. एम. पाटील आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
