चोपडा शहरात अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोझर.. व्यापारी व दुकानदारांची सामंजस्याची भूमिका.. पोलिस व आरसीपी जवानांचा चोख बंदोबस्त

 चोपडा शहरात अतिक्रमणावर  नगरपरिषदेचा बुलडोझर.. व्यापारी व दुकानदारांची सामंजस्याची भूमिका.. पोलिस व आरसीपी जवानांचा चोख बंदोबस्त

चोपडा, दि. ३ (प्रतिनिधी): चोपडा नगरपरिषदेने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करत बुधवारी व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. विशेष म्हणजे, या मोहिमेपूर्वी सलग तीन ते चार दिवस रिक्षाद्वारे शहरभर जनजागृती व आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक नागरिक व व्यावसायिकांनी अतिक्रमण हटाव पथक येण्यापूर्वीच स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.

मोहीमेची सुरुवात संविधान चौक येथून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटील दरवाजा, आठवडे बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसर, भाजीपाला मार्केट, आझाद चौक, बोहरा गल्ली, मुख्य बाजारपेठ, चावडी, गोल मंदिर परिसर आदी भागांमध्ये अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आलेल्या टपऱ्या, ओटे व इतर अडथळे हटविण्यात आले. एकूण सुमारे ५०० लहान-मोठी अतिक्रमणे व ओटे काढून शहरातील रस्ते मोकळे करण्यात आले.

काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असला तरी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेत संबंधितांना समजावून सांगितले. काही व्यावसायिकांनी आपले साहित्य हलविण्यासाठी दोन ते तीन तासांची मुदत मागितली. त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारत त्यांना आवश्यक मुदत दिली. भाजीपाला विक्रेते, चिकन-मटन विक्रेते तसेच मासे विक्रेते यांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार भाजीपाला विक्रेत्यांनी भाजी मंडईमध्ये, चिकन-मटन विक्रेत्यांनी मटन मार्केटमध्ये तर मासे विक्रेत्यांनी त्यांच्यासाठी नगरपरिषदेकडून निश्चित करून दिलेल्या जागांवरच व्यवसाय करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोहीम पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते अधिक मोकळे व प्रशस्त झाल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी "रस्त्यांनी पुन्हा श्वास घेतला" अशी प्रतिक्रिया व्यक्त करत नगरपरिषदेच्या कारवाईचे स्वागत केले. शहरातील विविध भागांतील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून इतर गल्ली-बोळांमधील अतिक्रमणेही टप्प्याटप्प्याने हटविण्याची मागणी केली.


 *मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन* 

यावेळी मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले,

"चोपडा शहर अधिक सुंदर, स्वच्छ, सुटसुटीत व वाहतुकीसाठी सुरक्षित व्हावे, ही नगरपरिषदेची भूमिका आहे. रस्ते व गटारींवरील अतिक्रमणे केवळ वाहतुकीस अडथळा निर्माण करत नाहीत, तर गटारींमध्ये घाण साचण्यास कारणीभूत ठरून आरोग्याच्या समस्याही वाढवतात. त्यामुळे सर्व अतिक्रमणधारकांनी कोणतीही कारवाई होण्याची वाट न पाहता संपूर्ण शहरात स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून नगरपरिषदेला सहकार्य करावे."


 *नागरिकांची प्रतिक्रिया* 


शहरातील एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले,"अनेक वर्षांपासून रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषदेने धाडसी व लोकहिताचा निर्णय घेत कारवाई केल्यामुळे आता रस्ते मोकळे दिसत आहेत. ही मोहीम नियमितपणे सुरू राहावी."

एका व्यावसायिकाने प्रतिक्रिया देताना सांगितले,"नगरपरिषद प्रशासनाने आधीच आवाहन केले होते. तसेच कारवाईदरम्यानही अधिकाऱ्यांनी समजूतदारपणे वागून साहित्य हलविण्यास वेळ दिला. त्यामुळे अनावश्यक नुकसान टळले. शहराच्या हितासाठी ही कारवाई आवश्यक होती."

 लोकप्रतिनिधींचे सहकार्य

या मोहिमेदरम्यान शहरातील  लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा मध्यस्थी न करता शहरहिताला प्राधान्य दिल्याबद्दल प्रशासनाने त्यांचे आभार मानले.

 अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त मेहनत 

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्याधिकारी रामनिवास झंवर, उपमुख्याधिकारी संजय मिसर, कर अधिकारी संदीप गायकवाड, नगर अभियंता दिगंबर वाघ, अतिक्रमण विभाग प्रमुख महेश जोशी, करनिरीक्षक प्रणव पाटील, मिळकत व्यवस्थापक संजय ढमाळ, लेखापाल मयूर शर्मा, भारती पाटील, नगर रचनाकार चेतन अहिरराव, अरुंधती देवरे, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, स्वच्छता निरीक्षक वसंत राठोड, दिपाली साळुंखे, जयेश भोंगे, पाणीपुरवठा अभियंता जितेंद्र मोरे, सर्व स्वच्छता मुकादम, लिपिक, कार्यालयीन कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पहिल्यांदाच नगरपरिषद एवढ्या संख्येने रस्त्यांवर उतरली होती.

पोलिस व RCP चे जवान यांचा चोख बंदोबस्त 

चोपडा शहर पोलीस वं नगरपालिका यांनी संयुक्तिक  शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अनधिकृतपणे केलेले बांधकाम, टपऱ्या, किंवा ओटे JCB च्या मदतीने कायदेशीर मार्गाने पाडून जागा  मोकळी केली. यावेळी  पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले,दोन फौजदार , पोलिस कर्मचारी 

RCP चे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवून महत्वपूर्ण भूमिका बजावली.

तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या पथकाने तसेच RCP पोलीस पथकाने मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

चोपडा नगरपरिषदेच्या या व्यापक कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच सातत्यपूर्ण मोहिमांद्वारे चोपडा शहर अधिक स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रशासनाचा निर्धार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने