खर्डी शिवारात बनावट देशी दारू पकडली..चारचाकी वाहनासह १ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
चोपडा,दि.२१ (प्रतिनिधी) - चोपडा तालुक्यातील खर्डी शिवारात बनावट देशी दारू पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चोपडा बीटचे दुय्यम निरीक्षक निकिता खपके यांच्या पथकाला यश आले असून या कारवाईत चारचाकी वाहनासह १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित विभागाने दिलेली सविस्तर माहिती अशी की,दि. १९/०५/२०२६ रोजी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क चोपडा बीट क्र.०१ यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार मारुती सुझुकी ८०० कंपनीची सिल्वर रंगाची चारचाकी गाडी क्र. एम एच १९ ए ई १५७३ मधून खर्डी धुपा माय रस्ता चोपडा जि. जळगांव येथे फरार आरोपी (गुरुदास अंकूश ठाकरे) उर्फ बिल्ला रा. सुटकार ता. चोपडा हा बनावट देशी मद्याची वाहतुक करणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती.त्यानुसार दि.२०/०५/२६ रोजी दुपारच्या सुमारास लोणी ते खर्डी शिवार येथे सापळा रचून सदर गाडीचा पाठलाग केला असता सदर आरोपी खर्डी - धुपा माय रस्त्या जवळ भागवत रामदास पाटील यांच्या शेतात गट नं. ३०/१ मौजे खर्डी शिवार ता. चोपडा जि. जळगांव येथे वाहन सोडून फरार झाला. सदर कारवाईत १६ हजार रुपये किमतीच्या बनावट देशी दारु टॅंगो पंच ९० मि.ली. च्या ४०० सिलबंद बाटल्या व ८ हजार रुपये किमतीच्या बनावट देशी दारु स्पेशल संत्रा ९० मि.ली.च्या २०० सिलबंद बाटल्या तसेच १ लाख ५० हजार रुपये किमतीचे मारुती सुझुकी ८०० कंपनीची सिल्वर रंगाची चार चाकी गाडी क्र. एम एच १९ ए.ई १५७३ या वाहनासह १ लाख ७४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई के. एन. गायकवाड प्र. निरीक्षक चोपडा,कु.निकीता पी. खपके दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चोपडा-१, चोपडा जवान नितिन पाटील, भुषण परदेशी, दिनेश पाटील यांच्या पथकाने केली.या विरुध्द मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ९० व १०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास डॉ. विठ्ठल टी. भुकन अधीक्षक, राज्य् उत्पादन शुल्क, जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली कु. निकीता खपके दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चोपडा-१ हे करीत आहे.
तरी जनतेने अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800339999 व व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निकीता पी. खपके दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क चोपडा बीट क्र. ०१ यांनी केले आहे.
