चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी
चौगाव,दि.१४(प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील चोपडा पासून अवघ्या पंधरा कि.मी.वर असणार्या जिल्ह्यातील एकमेव सुस्थितीत असलेला डोंगरी किल्ला म्हणजे चौगावचा किल्ला.बाराव्या शतकातील अहिर राज्यांच्या काळात भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सत्तावीस एकर मध्ये बांधण्यात आलेला हा किल्ला असून शालीवाहण काळातील लेण्या, एकाच दगडात कोरलेला सप्ततलाव समुह, सुमारे दहा गुंठे क्षेत्रावर असलेला गवळी वाडा, दोन दरवाजे, तटबंदी, नुकतेच पायथ्याशी सापडलेले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष,राणीकाजल माता समाधी, इतर समाधीस्थळ, जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा, तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर, तीन नाल्यांचा त्रिवेणी संगम यामुळे ऐतिहासिक, तिर्थक्षेत्र ,वन पर्यटन व निसर्ग पर्यटन म्हणून ओळख असलेल्या या किल्ल्यावर साधारणतः जून महिन्यापासून पर्यटकांची खूप मोठी गर्दी असते.पण मागील वर्षी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने रस्त्याची मात्र दुर्दशा झाली आहे.तरी पावसाळ्यापूर्वी चौगाव ते किल्ला रस्ता दुरुस्ती व्हावी अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.तसेच ठिक ठिकाणी बैठक आसण,पिण्याचे पाणी, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छता गृह,किल्ल्याला पायर्या,रेलींग व लाईटची व्यवस्था,क्षतीग्रस्त झालेले मंदिर, तसेच तटबंदी, प्रवेशद्वार, गवळी वाडा दुरूस्ती व अवशेषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
घनदाट जंगल, मोठ्या प्रमाणावर असलेली जैवविविधता, अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी व औषधी वनस्पतींचे यांचे जतन होणे गरजेचे आहे.इतर किल्ल्याप्रमाणे चौगाव किल्ल्यावर अवैध अतिक्रमण, अवशेषांची नासधूस,इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे
