ओटी भरण्याचा कार्यक्रमातही आता आधुनिकता ! विविध कार्यक्रमांनी आनंदाचा क्षण होतोय साजरा

 

ओटी भरण्याचा कार्यक्रमातही आता आधुनिकता !  विविध कार्यक्रमांनी आनंदाचा क्षण होतोय साजरा


गणपूर,ता चोपडा दि.12(प्रतिनिधी): घरात नवीन बाळ जन्माला येणे हा तसा आई-वडील आणि आजी आजोबांसाठीं आनंदाचा क्षण! आयुष्यात अनेक जण या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात. आणि अशाच या काळात खोळ भरणे किंवा ओटी भरणे हा गर्भवतीच्या सातव्या आठव्या महिन्यात होणारा संस्कृतीचा एक भाग आता आधुनिकतेचे रूप घेऊन आला आहे. हा आनंदाचा क्षणही आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या आनंदाने आणि विविध  कार्यक्रमांनी साजरा होऊ लागला आहे. कधी ग्रामीण भागात घरातल्या घरात शेजारच्या सुवासिनींना बोलाऊन ओटी भरली जात असे मात्र आता यालाही आधुनिकतेचे रूप आले आहे.संस्कृतीचा हा एक ठेवा वेगळ्या पद्धतीने साजरा होऊ लागला आहे. अंगणात मंडप, डेकोरेशन,झुलता आठ फुटी पाळणा, त्यात सजवून बसलेले पती-पत्नी, बाजूच्या सोफ्यावर बसलेले आजी आजोबा,विविध तालुका आणि जिल्हास्तरावर दहा ते पंधरा हजार रुपये देऊन विविध पात्रांसह भजन सादर करणाऱ्या महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, जमा होणाऱ्या सुहासिनी, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, आणि सायंकाळचे मिष्टान्न जेवण .अशा लाखभर रुपयात साजरा होणारा क्षण आता आधुनिकतेचे रूप घेऊन गावोगावी दिसू लागला आहे. घरात निर्माण झालेला आनंदाचा क्षण एका वेगळ्या आधुनिकतेने साजरा होऊ लागला असून हा काळाचाच एक बदल म्हणावा लागेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने