हिंदूंनी आपल्या संस्कृतीचा,ग्रंथांचा अभ्यास करावा-आशिष भारतवंशी
चोपडा,दि.१६(प्रतिनिधी) :- हिंदू समाजाने आपली पौराणिक संस्कृती अभ्यासली पाहिजे.हिंदू धर्माला हजारो वर्षांचा इतिहास आहे.संतांची मोठी परंपरा आहे.या सर्वांचा आपला अभ्यास गरजेचा आहे.आपण वेगवेगळ्या आक्रमणांमुळे गुलामगिरीची मानसिकता अद्यापही धरून बसलो आहोत.तीला बदलवून छत्रपती शिवाजी महाराज,गौतम बौध्द,विवेकानंद,झाशीची राणी,अहिल्यादेवी यांच्या समाजाप्रती दिलेल्या योगदानाचा अभ्यास केला पाहिजे.आपण परिपूर्ण असू तर कोणत्याही परधर्मियाची ताकद नाही आपल्यावर चाल करण्याची,परंतु आपण जाती-जातीत दुभंगलो आहोत.त्यामुळे सर्व कवच कुंडले गुंडाळून हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन आशिष भारतवंशी ( नागपूर) यांनी येथे केले.
चोपडा शहरातील साने गुरुजी वसाहत वस्तीतील हिंदू रहिवाश्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दि वर्षाच्या निमित्ताने आयोजित हिंदू संमेलनात श्री.भारतवंशी बोलत होते.यावेळी मंचावर ह.भ.प.सुशील महाराज विटनेरकर,प.पु.बाबा महाहंसजी महाराज (मनुदेवी) उपस्थित होते.
यावेळी अजय सुर्यवंशी ( शेंदुर्णी) म्हणाले की, जगातील सर्वात मोठे संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दि निमित्ताने हिंदू संमेलन हा एकजूटीचा मंत्र आहे.इस्लामी व ख्रिश्चन आक्रमणामुळे ७५० वर्षे पारतंत्र्यात होतो.आक्रमकांनी संस्कार, सभ्यता संपविण्याचे कार्य केले.हिंदु समाज संपला असे डॅा.केशव हेडगेवारांना वाटल्यामुळे संघाची स्थापना केली गेली.संघाने सर्व क्षेत्रात काम सुरु केले.सेवा घटकांना सर्व अखेरच्या स्तरापर्यंत पोहचविले आहे.५५० वर्षांनंतर अयोध्येत संविधानामुळे मंदिर निर्माण झाला आहे.कम्युनिस्ट विचारांचे आक्रमण अलिकडे झाले.स्व जागृत करण्यासाठी,जातीयता संपविण्यासाठी हिंदू संमेलने होत आहेत. सण उत्सवावर षडयंत्र वापरून सोशल मिडियावर आक्रमण सुरु केले.भारत महासत्ता होईल पण हिंदुत्व संपविण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनांनी प्रयत्न केले जात आहेत.हिंदुत्वाचे संस्कार असण्याची गरज आहे.पंचपरिवर्तन अंगिकरण्याची गरज आहे असे आवाहन सुर्यवंशी यांनी केले.
ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिराच्या प्रांगणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हिंदू संमेलन पार पडले.वक्ते व पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचलन सौरभ नेवे यांनी केले.तर वक्त्त्यांचे स्वागत नरेंद्र बाविस्कर,हिरामण भोई,श्री.आनंदी भवानी मंदिराचे अध्यक्ष भुषण पाटील,ज्ञानेश्वर पवार यांनी केले.
