बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कामगिरी!
चोपडा,दि.२०(प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात काही समाजकंटक दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करत असल्याच्या पार्श्वभूमीवर,पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अशा व्यक्तींची गोपनीय माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत.सदर आदेशाच्या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, उमर्टी गावाकडून कृष्णापूर ते मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन संशयित इसम एका मोटार सायकल वरून विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजविण्याच्या उद्देशाने येत आहेत. सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर, उमर्टी गावाकडून येणाऱ्या एका संशयित मोटार सायकलला (हिरोहोंडा, काळ्या रंगाची, निळे पट्टे असलेली क्र.MH-१९-S-९४५०) थांबवून त्यावरील दोन इसमांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या संशयितांकडे विचारपूस केली असता, त्यांनी त्यांची नावे १) राहुल कुवरसिंग पावरा, (वय २२ वर्षे, रा.उमर्टी, ता. चोपडा, जि. जळगाव) २) गणपत प्रभाकर किर्तने, वय-२८ वर्षे, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी सांगितली.नमुद आरोपीतांच्या ताब्यातून मिळालेला मुद्देमाल खालील प्रमाणे आहे. सदर आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून १ नग बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल,५ नग जिवंत काडतुसे,१ मोटार सायकल (हिरोहोंडा क्र. MH-१९-९-९४५०) आणि २ नग मोबाईल फोन असा एकूण रु. ६९,०००/- (एकोणसत्तर हजार रुपये मात्र) अंदाजित किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.विनापरवाना, बेकायदेशीररीत्या दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे स्वतःच्या कब्जात बाळगल्या प्रकरणी, सदर आरोपींविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५९/२०२६, शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक सौ.कविता नेरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिन्हाडे, दिपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
