चोपड्यात गॅस टंचाई भासवून अवाजवी दर घेऊन ग्राहकांची लूट.. ब्लॅकमध्ये सिलेंडर उपलब्ध?
चोपडा दि.१०( प्रतिनिधी):-इराण-ईस्त्राईल युद्धाची झळ चोपड्या पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. युद्धाचे निमित्त सांगत गॅस एजन्सीचालक चोपड्यात गॅस सिलेंडरच्या भीषण तुटवडा असल्याचे भासवून अनेकांना अकराशे, बाराशे, हजार रूपयांपर्यंत ग्राहकांना गंडवले जात असल्याचा भयावह प्रकार समोर येत आहे.चोपडा शहरात गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळत नाही मात्र अवैध विक्री करणाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर उपलब्ध असून ते चढ्या भावाने सरार्सपणे विक्री करतांना आढळून येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.त्यांच्याकडे एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध होतो कसा? असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एजन्सीवर गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगाच्या रांगा लागत असून गॅस सिलेंडर उपलब्ध नसून गाडी आली नाही असे सांगत घर वापसी केले जात आहे.दरम्यांन याच गॅस एजन्सीवर काम करणारे कर्मचारी ब्लॅक मधून अवाजवी दरात सिलेंडर उपलब्ध करून देत असून "अंधेरी नगरी चौपट राजा" कारभार सुरू झाला आहे.जणू एजन्सीवर कोणाचाही वचक नसून "हम करे सो कायदा "याप्रमाणे वागत असून ग्राहकांची प्रचंड लुबाडणूक होत आहे. तरी या गंभीर प्रकाराकडे तहसीलदार भाऊसाहेब राऊत व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नागरिकांची होणारी हेडसांड थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान काही पेट्रोल पंपावर पेट्रोल असून देखील जवळपास बंद असल्याचे सांगत पेट्रोल मिळत नसल्याने वाहनधारकांची चांगलीच फसगत होत आहे.
