नगरसेवक सुनील चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश.. धरणगावात मंगळवारपासून सिलेंडर घरपोच सेवा सुरू
धरणगाव,दि.२९ (प्रतिनिधी) – येथील इंडेन गॅस एजन्सीमार्फत होणाऱ्या गॅस सिलेंडर वितरणातील अनियमितता व गैरसोयींमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पहाटेपासूनच ग्राहकांना सिलेंडर मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या. कडक उन्हात तासन्तास उभे राहूनही अनेकांना वेळेत सिलेंडर मिळत नव्हता, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेवक सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव तालुक्यातील नागरिकांनी दिनांक २३ मार्च रोजी तहसीलदार तसेच पुरवठाद अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा उल्लेख करून गॅस सिलेंडरचा घरपोच पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली होती.
नगरसेवक चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि नागरिकांच्या एकजुटीमुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेतली. मागील आठवड्यातच पुरवठा विभागाने सिलेंडर घरपोच देण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आता येत्या मंगळवारपासून धरणगावात घरपोच सिलेंडर वितरण सेवा अधिकृतपणे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, रांगा, गर्दी आणि वेळेची होणारी नासाडी टळणार आहे. तसेच वितरण प्रक्रियेत शिस्त व पारदर्शकता येण्यासही मदत होणार आहे.
दरम्यान, नगरसेवक सुनील चौधरी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “सिलेंडरसाठी एजन्सीजवळ अनावश्यक गर्दी करू नये. घरपोच सेवाचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करून व्यवस्था सुरळीत ठेवावी.”एकूणच, नागरिकांच्या हितासाठी केलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे धरणगावातील गॅस वितरण व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे.
