मराठीचा गौरव, विज्ञानाची प्रेरणा घेत चोपडा शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे रंगला आनंदाचा सोहळा
चोपडा,दि.२८(प्रतिनिधी)एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चोपडा येथे मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.एम. पी. पाटील हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून अंतर्गत गुणवत्ता व्यवस्थापन समितीचे सदस्य गोविंदभाई गुजराथी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शुभम शिरसाळे, आशिषकुमार पाटील व शीतल महाजन यांनी मराठी भाषा दिनानिमित्त आपले विचार मांडले. त्यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यवैभव आणि संस्कारक्षमतेचा उल्लेख केला. तसेच दिव्या सपकाळे, शोएब शेख व संजना अस्वार यांनी विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर मनोगत व्यक्त केले.
प्रमुख वक्ते माननीय गोविंदभाई गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी ही प्रेम, आपुलकी व संस्कारांची भाषा असल्याचे सांगितले. मराठी साहित्य अतिशय समृद्ध असून प्रत्येकाने वाचनाची सवय जोपासावी, साहित्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. साहित्य वाचनामुळे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह,ययाती कादंबरी, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी याबरोबरच विविध समृद्ध लेखकांच्या साहित्याची माहिती त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मिळाली .
अध्यक्षीय भाषणात एम. पी. पाटील यांनी ‘रमण इफेक्ट’चा उल्लेख करत विज्ञानामुळे घडलेली क्रांती, आधुनिक काळातील बदल व समोर उभी ठाकलेली आव्हाने विद्यार्थ्यांसमोर मांडली. आजच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ बौद्धिक नव्हे तर शारीरिक श्रमांचीही गरज आहे. योग व व्यायाम यांचा जीवनशैलीत समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. सविता जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. कला शिक्षिका मीनल पाटील यांनी कार्यक्रमासाठी आकर्षक फलक लेखन केले.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे, प्रा. श्री. एन. डी. वाल्हे, ग्रंथपाल श्री. एम. एल. पटेल, कार्यालयीन मुख्य लिपिक श्री. शरद पाटील, कनिष्ठ लिपिक श्री.आशिष शहा व तंत्र सहाय्यक शुभम गुजराथी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात संपन्न झाला.
