वर्डीला 3 मार्च रोजी सद्गुरू सुखनाथ बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त महा भंडाराचे आयोजन ..

 वर्डीला  3 मार्च रोजी सद्गुरू सुखनाथ बाबांच्या  पुण्यतिथी महोत्सवानिमित्त महा भंडाराचे आयोजन ..

🔲२००क्विंटल गहू,५०क्विटल तूरदाळ तर ४ ट्रक्टर ट्राली वांगीचा महाप्रसाद..तालुक्यातून भाविकांची उसळणार तोबा गर्दी 


वर्डी ,ता. चोपडा, दि. २७ (प्रतिनिधी): येथील ग्रामदैवत व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या समर्थ सद्गुरू सुखनाथ बाबा यांच्या ९१व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार दि. ३मार्च २०२६ रोजी  महा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा आयोजित करण्याची परंपरा ९०वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात.  सन १९३५ मध्ये फाल्गुन प्रतिपदेला सुखनाथ बाबांनी भक्तांच्या साक्षीने जिवंत समाधी घेतली होती. त्या दिवसापासून दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी या भक्ती महोत्सवाचे आयोजन केले जाते. सुखनाथ बाबा यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव रघुनाथ बाबा यांनी गादीची परंपरा सांभाळली.

रघुनाथ बाबा यांनीही १९७९ मध्ये वैशाख शुद्ध द्वादशीच्या दिवशी समाधी घेतली. त्यानंतर त्यांचे जावई जगन्नाथ बाबांनी गादीची परंपरा सांभाळली. जगन्नाथ बाबा यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव दीनानाथ महाराज उर्फ भैय्या महाराज यांनी गादी परंपरा सुरू ठेवली आहे.  भंडाऱ्याच्या महाप्रसादासाठी 200 क्विंटल गहू, ५0 क्विंटल तूरडाळ व साधारणत: चार ट्रॉली वांगी वापरली जाणार आहेत. महाप्रसादासाठी शेकलेली बट्टी , वरण व वांग्याची भाजी असा मेनू असतो.

महाप्रसाद तयार करण्यासाठी गावातील सर्व महिला, पुरुष व तरुण मंडळी उत्स्फूर्त सहभाग घेतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी उपस्थित राहावे म्हणून चोपडा आगारातून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

 *असे होईल कार्यक्रम* 

  सकाळी सातला आरती, आठला समाधी अभिषेक, नऊला समाधी स्नान, अकराला होमहवन, दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत महाप्रसाद, या दरम्यान सायंकाळी आरती व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाप्रसाद व पालखी मिरवणुकीचा लाभ घेण्याचे आवाहन भंडारा आयोजन समिती तसेच मठाधिपती दीनानाथ महाराज तसेच पोलिस पाटील पद्माकर महाराज व ग्रामस्थांनी केले आहे.

---

*भंडाऱ्याची परंपरा कशी सुरू झाली?*

समाजातील फूट आणि जातीयवाद दूर करून हिंदू समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने या भंडाऱ्याची सुरुवात करण्यात आली.सुरुवातीला अत्यंत साध्या पद्धतीने सुरू झालेला हा उपक्रम आज भव्य स्वरूप धारण करून लाखो भाविकांना आकर्षित करतो.

गावकऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने आणि लोकवर्गणीतून हा उत्सव आयोजित केला जातो. कोणतीही शासकीय मदत न घेता संपूर्ण खर्च गावकरी आणि भक्तगण उचलतात, ही या परंपरेची विशेष बाब आहे.

 *उत्सवाची वैशिष्ट्ये* 

होळीच्या तयारीसाठी गावात अनेक दिवसांपूर्वीच हालचाली सुरू होतात. तरुण मंडळी जंगलातून लाकूड गोळा करतात. महिला, पुरुष, लहान मुले सर्वजण या तयारीत सहभागी होतात. तीन दिवस गावात उत्सवाचे वातावरण असते.

धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी सहा वाजता बाबांच्या समाधीला अभिषेक करून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर भंडाऱ्याचा प्रसाद वाटप केला जातो. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि गुजरात येथूनही हजारो भाविक या उत्सवाला उपस्थित राहतात.

 *एकतेचा संदेश देणारा उत्सव* 

हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या विचारसरणीला उत्तर देत वर्डी येथील सुकनाथ बाबा भंडारा हिंदू समाजातील ऐक्याची प्रचिती देतो.

समाजात प्रेम, बंधुता आणि एकजूट वाढविण्यासाठी अशा परंपरा महत्त्वपूर्ण ठरत असून वर्डी गावाचा हा उत्सव संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने