मोबाईल सोडा, मैदानी खेळांत रममाण व्हा” : मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील

 “मोबाईल सोडा, मैदानी खेळांत रममाण व्हा” : मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील 



चोपडा ,दि.१२ (प्रतिनिधी ):  पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित, पंकज बालसंस्कार केंद्रात गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी हिवाळी क्रीडा स्पर्धांचा रंगतदार व उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षस्थानी असलेले मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील  व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभाग प्रमुख मीना माळी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासासोबत खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री महाजन यांनी केले.

स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी धावणे, संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे, बॅलेंसिंग अशा विविध रोमांचक खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धेत मुलांचा जोश, चिकाटी आणि खेळाडूवृत्ती विशेष लक्षवेधी ठरली. संपूर्ण परिसरात आनंद, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील  यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत “मोबाईलचा अतिरेक टाळून मैदानी खेळ, योगासन, नियमित व्यायाम आणि ध्यानधारणेकडे वळणे आवश्यक आहे,” असे मार्गदर्शन केले. सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक सुदृढता महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या हिवाळी क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, आत्मविश्वास आणि उत्साह दुणावल्याचे चित्र पाहायला मिळाले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनीही कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने