शेतीतील नाविन्यपूर्ण कार्याबद्दल जयेश पाटील यांचा ‘कृषीधन–२०२६’ केळी महोत्सवात गौरव
घोडगाव,दि.८(प्रतिनिधी): कुसुंबा (ता. चोपडा) येथील प्रगतशील शेतकरी श्री. जयेश ज्ञानेश्वर पाटील यांना शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याबद्दल कृषीधन–२०२६ भव्य कृषी प्रदर्शन व केळी महोत्सवाच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सातपुडा विकास मंडळ, पाल संचालित कृषी विज्ञान केंद्र, पाल व कृषी विभाग, जळगाव (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला.
दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी फैजपूर (ता. यावल, जि. जळगाव) येथे आयोजित कृषीधन–२०२६ कृषी प्रदर्शनात पुरुष गटात शेती विषयक नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री. पाटील यांचा गौरव करण्यात आला. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, केळी पिकातील उत्पादनवाढ, शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब तसेच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या कार्याची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती.
सदर सन्मान सोहळ्याप्रसंगी सातपुडा विकास मंडळाचे सचिव श्री. अजित पाटील, माजी आमदार व संचालक श्री. शिरीष मधुकरराव चौधरी, कृषी विज्ञान केंद्र, पाल येथील प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. महेश महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुरबान तडवी, तालुका कृषी अधिकारी श्री. दीपक साळुंखे तसेच जैन इरिगेशन प्रा. लि., जळगाव येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. बी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय सन्मानामुळे चोपडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गात अभिमानाची भावना निर्माण झाली असून श्री. जयेश पाटील यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
