चोपडा महाविद्यालयात शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

 चोपडा महाविद्यालयात शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा


चोपडा,दि.२०(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा येथील इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.    यावेळी  मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

    या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष  ॲड.संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ . सौ.स्मिता संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी विचार मंचावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एम. बागुल उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस. ए.वाघ, प्रमुख वक्ते म्हणून डॉ.आर.आर.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य  पी. एस पाडवी, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख श्रीमती एस. बी.पाटील यांनी केले. यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रगती चव्हाण या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले व शिवगर्जना करून वातावरण निर्मिती केली तसेच जागृती बारी या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सुंदर पोवाड्याचे सादरीकरण केले. या पोवाड्यास महाविद्यालयातील प्रा.डॉ. बी एम सपकाळ यांनी रुपये 200 रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले. 

    याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांवर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध घडामोडींवर अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. यावेळी ते म्हणाले की, शिवरायांनी रायरी किल्यावर आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व या सर्व जाती-धर्मातील सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. यातून शिवरायांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचे दर्शन त्यांनी आपल्या व्याख्यानातून करून दिले. 

   यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ.एस.ए.वाघ यांनी शिवरायांवर आपले विचार व्यक्त करत ते म्हणाले की, 'शिवरायांना स्वराज्य स्थापनेत आलेल्या विविध अडचणींवर मार्ग काढत त्यांनी स्वराज्य निर्मितीचे कार्य केले. माणूस ओळखण्याची पारख शिवाजी महाराजांकडे होती. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वराज्य स्वतःचे वाटत होते. राज्य आपले आहे व आपण राज्यासाठी वाटेल ते केले पाहिजे, ही भावना शिवराय त्यावेळी लोकांमध्ये निर्माण करू शकले.यामुळे शिवाजी महाराज इतर राज्यांपेक्षा वेगळे राजे ठरले' असे मत त्यांनी मांडले.

    यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल म्हणाले की, 'आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची समाजाला व देशाला प्रचंड गरज आहे. त्यांच्या विचारांचे जागर व्हावे या हेतूने प्रत्यक्ष पुरावे दखल पुस्तकांचे वाचन आजच्या पिढीने करावे' असे आवाहन देखील त्यांनी आपल्या मनोगतातून केले. 

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .सुनंदा नन्नवरे यांनी केले तर आभार  संदीप पाटील यांनी केले.या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील  शिक्षक- शिक्षकेतर बंधू -भगिनी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी अभिवादन कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या समवेत चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने