आमदार प्रा. श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते चोपडा नगरपरिषदेसाठी अत्याधुनिक स्वच्छता मशिनरीचे भव्य लोकार्पण
चोपडा दि.२४(प्रतिनिधी):चोपडा नगरपरिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम, परिणामकारक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने नव्याने खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वच्छता मशिनरीचा लोकार्पण सोहळा आमदार प्रा. श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील, उपनगराध्यक्ष श्री. पंकज बोरोले, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*स्वच्छतेकडे आधुनिकतेची वाटचाल*
शहरातील वाढती लोकसंख्या, वाढणा-या कचऱ्याचे प्रमाण व स्वच्छतेच्या कामकाजात गती येण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्राप्त मशिनरीच्या माध्यमातून रस्ते सफाई, नालेसफाई, कचरा संकलन व वाहतूक, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आदी कामे अधिक जलद, सुरक्षित व कार्यक्षम पद्धतीने करता येणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळावरील ताण कमी होऊन कामकाजाची गुणवत्ता व वेग दोन्ही वाढणार आहेत.
*मान्यवरांचे मार्गदर्शन*
या प्रसंगी आमदार प्रा. श्री. चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नगरपरिषदेच्या स्वच्छता उपक्रमांचे कौतुक केले. “स्वच्छ शहर हीच खरी प्रगतीची ओळख आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नवीन मशिनरीमुळे चोपडा शहर स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी आपल्या मनोगतात नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्वच्छता उपक्रमांची माहिती देत, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासन व नागरिक यांचे परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणी टाकावा, ओला व सुका कचरा वेगळा करावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
