"दोडे गुजराऊ बोलीने मराठीच्या मूलभूत चौकटीत राहूनही स्वतंत्र स्वरूप टिकवून ठेवलंय : विलास खेडीभोकरीकर ♦️३६ जिल्हयांमध्ये शासनाच्या 'बोलींचा जागर ' कार्यक्रम संपन्न

 "दोडे गुजराऊ बोलीने मराठीच्या मूलभूत चौकटीत राहूनही स्वतंत्र स्वरूप टिकवून ठेवलंय : विलास खेडीभोकरीकर 

♦️३६ जिल्हयांमध्ये शासनाच्या 'बोलींचा जागर ' कार्यक्रम संपन्न 


चोपडा दि.४(प्रतिनिधी)मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मराठी भाषेच्या विविध बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने नुकताच ३६ जिल्हयांमध्ये  'बोलींचा जागर ' कार्यक्रम संपन्न झाला .

शासनाच्या या उपक्रमाचा १ भाग म्हणून धुळे जिल्हयातील  का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था देवपूर धुळे व मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  'बोलींचा जागर ' कार्यक्रमात अहिराणी व गुर्जर बोली या बोली भाषांचा जागर करण्यात आला .

यात गुर्जर बोली भाषा अभ्यासक म्हणून बोलतांना गुर्जर बोलीची उपबोली दोडे गुजराऊ बोली संदर्भात विलाससर खेडीभोकरीकर यांनी विचार मांडले की, विविध प्रदेशातील बोली - उपबोली मराठी भाषेच्या मूळ प्रवाहाला अनेक स्तरांवर समृद्ध करतांना दिसतात .

यात खानदेश परिसरातील गुर्जर , त्यांच्या ४ -५ पोटजाती व त्यांच्या गुजराऊ बोली ,त्यांच्या पोट बोली या मराठी भाषेच्या विशाल वृक्षाच्या डहाळ्या आहेत . त्यातील दोडे गुजराऊ बोली ही एक वैशिष्टय पूर्ण डहाळी असून या पोटबोलीने मराठी भाषेच्या मूलभूत चौकटीत राहूनही आपले स्वतंत्र व्याकरणिक, शब्दरूपात्मक व ध्वन्यात्मक लहेजासहचे स्वरूप टिकवून ठेवले आहे . गुजराऊ बोलीचा उगम हा प्रामुख्याने गुर्जर समाजाच्या स्थलांतराशी निगडीत असल्याने राजस्थानी, गुजराती, खान्देशी भाषिक प्रवाहांच्या संपर्कातून गुजराऊ बोलीचा विकास झाला असला तरी दोडे गुजराऊ बोलीची  संरचना मुख्यत्वे मराठी भाषा कुळातच बसते . मौखिक परंपरा, सण मंगल सोहळे यातील गाणी,लोकगीतं, लोककथा, म्हणी- वा .प्र. यां मधून ही दोडे गुजराऊ बोली पिढ्यान पिढया जतन होत आली आहे असे प्रतिपादन करतां ना विलास पाटील यांनी दो डे गुजराऊ बोलीचे स्वरूप व तिची मराठी - प्रमाण भाषेशी तुलना करतांना काही विशेष व्याकरणिक वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट केली .

तसेच शहरी स्थलांतरण, शिक्षण -व्यवसायात प्रमाण भाषेचा वाढता वापर व सर्वत्र सर्वच बोली भाषा वापरण्या मागील न्यूनगंड, त्याची कारणे, बोलींच्या इतिहास संशोधनाची प्रचंड उदासिनता,दस्तऐवजीकरणाचे तोकडे प्रयत्न , अत्यल्प नव्हे तर नसल्या बरोबरची गुजराऊ  बोलीतील ग्रांथिक रूपं ( अपवाद श्री .जगन जिभाऊ रेलकरांचे गुजरी गुंफण ' इ . ), अशी इतर बोलीं प्रमाणे दोडे गुजराऊ बोलीच्या जतन, संवर्धन व संरक्षणाची वाढती आवश्यकता, उपाय व प्रयत्न जर गांभिर्याने झाले नाहीत व भविष्यात दोडे गुर्जर समाजाचे शहरी स्थलांतर वाढते राहिले तर क्षीण होत जाणाऱ्या दोडे गुजराऊ बोलीचे भविष्य ही येत्या २५ -३० वर्षात प्रख्यात भाषा अभ्यासक, संशोधक डॉ. श्री.गणेश देवी यांच्या म्हणण्यानुसार इतर बोली प्रमाणे चिंताजनक आहे ,अश्या शब्दांत दोडे गुजराऊ बोलीबाबत  शासनातर्फे निमंत्रक गुर्जर बोली भाषा अभ्यासक म्हणून थोडक्यात उहापोह विलास खेडीभोकरीकर यांनी केला .

धुळे येथील या बोलींचा जागर कार्यक्रमा वेळी अहिराणी बोली वर प्रा .डॉ. फुला बागुल, रमेश सूर्यवंशी यांनी तसेच गुर्जर बोली वर प्रा .डॉ .सुधाकर चौधरी यांनी आपले विचार मांडले तसेच भाषा संचालनालयाचे श्री . ह .म . सूर्यवंशी, संदीप साबळे, अनुवादक श्री . नामदेव कोळी तसेच धुळे का .स .वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्राचे अध्यक्ष श्री . शशिकांत धामणे, सचिव -डॉ. शोभा शिंदे, विश्वस्त -डॉ .वंदना महाजन यांनी ही आपले विचार व्यक्त केले .

शासनाच्या अश्या या 'बोलींचा जागर ' सारख्या सुंदर  कार्यक्रमातून बोलींच्या जतन संवर्धन व संरक्षणासाठी अभ्यासकांना निश्चित प्रेरणा मिळून समाजात भाषिक जागरुकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा सूर भाषा अभ्यासक वक्त्यांनी आळविला .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने