निवडणूक आखाड्यात उतरण्या आधीच जनतेची केली स्व: खर्चाने लाखोंची कामे..जनसेवेने झपाटलेले नगरसेवक सुनील पंढरीनाथ चौधरी यांच्या कार्याचा गवगवा
धरणगाव,दि.६(प्रतिनिधी) कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक श्री. सुनील पंढरीनाथ चौधरी हे केवळ लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक जाणीव जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र परिचित आहेत. नगरसेवक होण्यापूर्वीपासूनच त्यांनी समाजोपयोगी, लोकहिताचे आणि अध्यात्मिक कार्य सातत्याने स्वखर्चाने व निःस्वार्थ भावनेने राबवले असून, आजही हीच परंपरा अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात पुढे नेत आहेत.
सोनवद रोड, धरणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मानसिक शांती लाभावी, या उद्देशाने त्यांच्या सहकार्याने पत्र्याचा बोर्ड लावण्यात आला असून, त्यावर अत्यंत पवित्र असा शांती मंत्र कोरलेला आहे —
“ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||
ॐ शांतीः शांतीः शांतीः ||”
या मंत्रामुळे शोकाकुल वातावरणातही अंतर्मनाला शांततेचा आधार मिळतो, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
तसेच सोनवद रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने ऊन-पाऊस आणि गैरसोयीचा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन श्री. सुनील चौधरी यांनी स्वखर्चाने पाच लाख पन्नास हजार रूपयांची पदरमोड करीत पत्र्याचे शेड उभारून दिले, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळील स्मशानभूमीत देखील शांती मंत्राचा स्वतंत्र बोर्ड लावण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ही सर्व सामाजिक व अध्यात्मिक कामे त्यांनी नगरसेवक होण्याआधीपासूनच सुरू केली होती. पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी देण्याची भावना त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून सातत्याने दिसून येते.
धरणगाव परिसरातील तेली तलावाजवळील मारुती मंदिरावर भाविकांना उन्हापावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी स्वखर्चाने पत्र्याचे शेड उभारून दिले. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना याचा मोठा लाभ होत असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. गावातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कायदा-सुव्यवस्था, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता तसेच सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. शाळा व महाविद्यालयांमधील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा उपक्रम त्यांनी सातत्याने राबवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्तीबरोबरच आत्मविश्वास वाढीस लागला आहे.
व्यावसायिक क्षेत्रात “श्री मंगल कार्यालय अँड लॉन्स” तसेच चौधरी टेन्ट हाऊस या नावाने ते व्यवसाय करीत असून, या माध्यमातून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. व्यवसाय आणि समाजसेवा यांचा समतोल साधत, मिळालेल्या यशाचा उपयोग समाजहितासाठी करण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अध्यात्मिक क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय आहेत. विविध ठिकाणी शिवपुराण कथा, श्रीमद् भागवत कथा, कीर्तन सप्ताह, नामस्मरण व धार्मिक प्रवचने अशा अनेक अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन व सहकार्य त्यांनी केले आहे. या उपक्रमांमुळे समाजात सद्भावना, नैतिक मूल्ये आणि संस्कार वृद्धिंगत होत आहेत.
याशिवाय, तिळवण तेली समाजाच्या तेलाठी विभागाचे अध्यक्ष म्हणूनही श्री. सुनील पंढरीनाथ चौधरी कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तरुण पिढी मोठ्या संख्येने संचालक मंडळात सहभागी झाली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जात असून, युवकांना सकारात्मक दिशेने वाटचाल करण्याची संधी त्यांच्या नेतृत्वामुळे मिळत आहे.
एकंदरीत पाहता, सामाजिक बांधिलकी, अध्यात्मिक दृष्टिकोन, लोकहिताचे भान, नेतृत्वगुण आणि कार्यातील सातत्य या गुणांमुळे श्री. सुनील पंढरीनाथ चौधरी हे धरणगाव शहरातील एक आदर्श लोकप्रतिनिधी व समाजनेते म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध घटकांना प्रत्यक्ष लाभ होत असून, “सेवाच खरा धर्म” या तत्त्वाला त्यांनी आपल्या कृतीतून खऱ्या अर्थाने न्याय दिला .
