पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षा 2026 संदर्भात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पालकांना मार्गदर्शन
चोपडा,दि.६(प्रतिनिधी) :पंकज विद्यालय चोपडा (प्राथमिक विभाग) येथे या वर्षापासून इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तयारीसाठी पालकांची मार्गदर्शनपर सभा उत्साहात पार पडली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीनि विश्व कल्याण प्रार्थनेने सभेची सुरुवात केली.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश, गुणवत्ता वृद्धी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्वल निकाल या उद्देशाने ही सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेच्या प्रारंभी डी एम जैस्वाल यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे विषय स्वरूप, प्रश्नपत्रिकेची रचना, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक, तसेच परीक्षेचे बदलते स्वरूप याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. भाषा , गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित तयारी कशी करावी, याचे स्पष्ट मार्गदर्शन पालकांना करण्यात आले.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांची माहिती विजय राठोड यांनी दिली. त्यामध्ये
नियमित सराव चाचण्या
OMR उत्तरपत्रिका सराव
विषय निहाय मार्गदर्शन वर्ग
प्रश्न सोडवण्याच्या क्लुप्त्या
दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तास
वेळ व्यवस्थापन व आत्मविश्वास वाढीसाठी उपक्रम
यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत सांगितले की, “शिष्यवृत्ती परीक्षा ही केवळ आर्थिक लाभापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा कस पाहणारी महत्त्वाची परीक्षा आहे. शाळा व पालक यांचा समन्वय साधल्यास निश्चितच यश साध्य करता येईल.” तसेच विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
सभेत उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याची, मोबाईल व टीव्हीपासून योग्य अंतर ठेवण्याची आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवण्याची तयारी दर्शविली. पालकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत “आम्ही मुलांच्या यशासाठी शाळेसोबत पूर्ण सहकार्य करू” असा विश्वास व्यक्त केला.
सभेच्या शेवटी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सातत्य व शिस्त या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन सभेत करण्यात आले. या पालक सभेमुळे पालकांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या यशासाठी नवी ऊर्जा मिळाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी आभार मनोज अहिरे यांनी व्यक्त केले. नियोजनात सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.

