बँक कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढली; सर्वसामान्य नागरिकांचे हाल
लासुर,ता.चोपडा,दि.६(प्रतिनिधी) : शहरातील अनेक सरकारी व खासगी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. बँकेत येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना वेळेवर सेवा न मिळणे, अर्जांची विलंबाने पूर्तता होणे, तसेच ओळखीच्या लोकांचीच कामे लवकर होणे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यासाठी ज्या कर्मचाऱ्याला बँकेत तीन वर्षाच्या कालावधी झाला असेल अशा कर्मचाऱ्यांची बदली व्हावी व स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्याला त्या स्थळावरून बदली करून हकाल पट्टी करावी, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे
ग्राहकांचे म्हणणे आहे की, बँकांतील अनेक अधिकारी व कर्मचारी आपली कामे लवकर आटोपून टाळाटाळ करतात. कर्ज मंजुरी, खात्यांचे कामकाज, कागदपत्रे तपासणी अशा विविध प्रक्रियेत अकार्यक्षमता दिसून येत आहे. याउलट, जर एखादी व्यक्ती ओळखीची असेल, तर तिचे काम तत्काळ मंजूर होते. ही दुजाभावाची वृत्ती सामान्य नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करत आहे.
विशेषतः शेतकरी, लघु उद्योजक आणि पेन्शनधारक यांना वारंवार बँकेत फेऱ्या माराव्या लागतात. काही प्रकरणे तर महिनोनमहिने प्रलंबित राहतात. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण वेळ व मानसिक त्रासही सहन करावा लागतो.
यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की, अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या बदल्या तात्काळ करण्यात याव्यात. तसेच बँक व्यवस्थापनाने ग्राहक सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. काही कर्मचाऱ्यांची भाषाशैली अरेरावीची असते अशा कर्मचाऱ्यांमुळे सुप्रसिद्ध असलेल्या बॅंकेचे ग्राहक कमी होऊ नये या गोष्टीची खबरदारी व्यवस्थापाकासह स्थानिक चेअरमन महोदयांनी घ्यावी. कारण बँका या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे पारदर्शक, तत्पर व ग्राहकाभिमुख सेवा देणे ही त्यांची जबाबदारी आहे. अन्यथा लोकांचा बँक व्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची शक्यता आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक आहे.
