अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महसूल मंत्र्यांना साकडे
अमळनेर दि.३१(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील सर्व मंडळानां अतिवृष्टीचे व अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ना. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन एका पत्रकान्वये प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे.
 जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील भरवस मंडळ, पातोंडा मंडळ, नगाव, सारबेटे, मंडळ, शिरूड मंडळ, मांडळ मंडळ ,दहिवद मंडळ, या भागात जास्तीची अतिवृष्टी झालेली आहे, तरी ही मंडळे नुकसान भरपाईसाठी अद्याप पर्यंत तहसीलदार साहेबांनी समाविष्ट केलेली नाहीत. तरी आपण लक्ष घालून  शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.
हे निवेदन श्री शिवराम पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव, प्रहार जनशक्ती पक्ष,श्री संतोष पाटील तालुका अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष अमळनेर, यांच्या वतीने 
 महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन देण्यात आले.अमळनेर तालुक्यातील जास्तीचे नुकसान झालेल्या क्षेत्रावर आपण जरूर फेर विचार करावा असे सांगून  परिस्थिती  अवगत करून दिली. महसूल मंत्री नात्याने प्रशासनास आदेश देऊन, लवकरात लवकर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल, असे आश्वासन  मंत्री महोदयांनी दिले.
